गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची अनोखी स्टाइल, त्याचा डान्स, डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा’ या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. हिंदी व्हर्जनमध्ये अल्लू अर्जुनला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. अल्लू अर्जुनने श्रेयसचे कौतुक करत आभार मानले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर अल्लू अर्जुनच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा व्हिडीओ स्वत: श्रेयस तळपदेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “श्रेयसजी चित्रपटासाठी तुमचा सुंदर आवाज दिल्याबद्दल खूप आभार. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानू इच्छित आहे. ‘पुष्पा’ या पात्रात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल तुमचे खूप आभार” असे अल्लू अर्जुन बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा : ‘पुष्पा’ची क्रेझ; रवींद्र जडेजाचा लूक पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…
‘पुष्पा’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी रुपये मानधन? ऐकून बसेल धक्का
श्रेयसने हा व्हिडीओ शेअर करत ‘अल्लू अर्जुन तुझे खरच मनापासून आभार. तसेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी माझा आवाज योग्य आहे असा विचार केल्याबद्दल मनीष शाह तुमचेदेखील आभार. माझ्या आवाजातील सुधारणेसाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंड डायरेक्टर अब्दुल तुमचेही मनापासून धन्यवाद’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. श्रेयशच्या या पोस्टवर अमृता खानविलकर, संकर्षण कऱ्हाडे अशा अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.