Shreyas Talpade Dubbed Pushpa 2 :’पुष्पा : द राइज’ या चित्रपटाच्या यशानंतर, निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग ‘पुष्पा २ : द रुल’ प्रेक्षकांसमोर आणला. हा सिनेमा ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. पुष्पा हा सिनेमा हिंदीत मोठा हिट होण्यामध्ये मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मोठा वाटा होता. या सिनेमाचे डबिंग श्रेयस तळपदेने केले होते. त्यामुळेच ‘पुष्पा’च्या दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी हिंदीमध्ये डबिंग करण्याची जबाबदारी अभिनेता श्रेयस तळपदेवर सोपवण्यात आली. एका मुलाखतीत श्रेयस तळपदेने सांगितले की, तो आजवर कधीही अल्लू अर्जुनला प्रत्यक्षात भेटलेला नाही. याच मुलाखतीत त्याने या सिनेमाचे डबिंगबाबतचे अनुभव सांगितले.

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ या चित्रपटातील आपल्या योगदानाविषयी ‘ई-टाइम्स’बरोबर बोलताना श्रेयस तळपदेने या चित्रपटासाठी त्याला पुन्हा एकदा डबिंग करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सिनेमाचे डबिंग तोंडात कापूस ठेवून केले, असे श्रेयसने या मुलाखतीत सांगितले. त्याचे कारण सांगताना श्रेयस म्हणाला, ” ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनचे पात्र कधी मद्यपान करताना, तर कधी तंबाखू खाताना दाखवले आहे. जेव्हा अल्लू अर्जुनचे पात्र सिनेमात तंबाखू खाऊन बोलताना दाखवले आहे, तेव्हा मी तोंडात कापूस ठेवून त्या संवादांचे डबिंग केले,” असे श्रेयसने नमूद केले.

हेही वाचा…Pushpa 2 : हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आवाज! अल्लू अर्जुनबद्दल म्हणाला, “आत्मविश्वास, स्वॅग अन्…”

पुढे श्रेयस तळपदे म्हणाला “मी अद्याप अल्लू अर्जुन यांना भेटलेलो नाही. आमच्यात कधीच संवाद झालेला नाही. त्यामुळे माझ्या कामाविषयी अल्लू अर्जुन काय प्रतिक्रिया देतील, याबाबत मला अद्याप माहीत नाही.” मात्र, ‘पुष्पा’च्या वेळी अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेच्या डबिंगविषयी माध्यमांसमोर बोलताना हिंदी डबिंग छान झाले आहे, असे म्हटले होते. या वेळेसही अल्लू अर्जुन यांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. पण आताच सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे श्रेयस आणखी काही दिवस थांबून स्वतःच्या कामाविषयीच्या अल्लू अर्जुनच्या प्रतिक्रियेची वाट पाहणार आहे.

श्रेयसने अशी केली ‘पुष्पा २’ ची तयारी

मुलाखतीदरम्यान श्रेयसने या चित्रपटावर काम सुरू करताना आलेल्या टेन्शनबद्दलही सांगितले. तो म्हणाला, ” ‘पुष्पा : द राइज’ प्रदर्शित होताना कोणत्याही अपेक्षा नव्हत्या. त्यावेळी काय होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. मात्र, पहिल्या चित्रपटानंतर प्रेक्षकांचा मिळालेला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहता, यावेळी काम सुरू करताना मला थोडं टेन्शन आलं”, असे त्याने सांगितले. ‘पुष्पा २’साठी काम करताना “थोडा दबाव होता” हे श्रेयसने मान्य केले. मात्र, आपण कुठलाही विचार न करता, फक्त आपले काम चांगले करायचे आहे, असे श्रेयसने स्वतःला सांगितले.

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

श्रेयस तळपदेने सांगितले, “यावेळी पुष्पा या पात्राची शैली आणि व्यक्तिमत्त्व यांच्याशी आवाजाचा ताळमेळ जमावा यासाठी त्याने दोन तासांची १४ सत्रे घेतली. आपल्या पथकाबरोबर त्याने अनेक बारकाव्यांवर काम केले आणि जेव्हा काही गोष्टी पुन्हा सुधारण्याची गरज वाटली, तेव्हा त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नही केले. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून सर्व प्रयत्न सार्थ झाले.”

Story img Loader