सरकारी योजनांच्या कृपेने ‘पोश्टर’वर झळकलेले तीन चेहरे आणि त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य आयुष्यात घडलेले महाभारत अशा हलक्याफुलक्या कथेचा आधार घेत कुटुंब नियोजनाचा दिलेला संदेश यामुळे अभिनेता श्रेयस तळपदे याची निर्मिती असलेला ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला. सर्वच स्तरातून चित्रपटाला मिळालेल्या लक्षणीय प्रतिसादामुळे या ‘पोश्टर बॉईज’ची पुढची कथाही लोकांना ऐकवायची असा निर्धार श्रेयसने केला असून या सिक्वलपटाच्या निमित्ताने श्रेयस दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट हिंदीतही येतो आहे. त्याची पटकथा लिहिण्याचे काम सुरू असतानाच मला या तिघांना घेऊन एक कथा सुचली. मी ती कथा माझ्या मित्रांना, टीमला आणि ‘दार मोशन पिक्चर्स’चे विवेक रंगाचारी यांना ऐकवली. त्यांना ती कथा आवडली आणि मग सिक्वलपट करायचा निर्णय झाल्याचे श्रेयसने सांगितले. पण, या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन करण्याचा विचार हा अनपेक्षितपणेच आल्याचे तो म्हणाला. चित्रपटाची कथा माझी होती. त्यामुळे या कथेची चित्रपटरूपातील मांडणी तुझ्या डोक्यात स्पष्ट आहे. मग तूच का दिग्दर्शन करत नाहीस? असा प्रश्न सगळ्यांनी केल्यानंतर मीही याचा गंभीरपणे विचार के ला. निर्माता होण्याचा विचारही असाच अनपेक्षितपणे माझ्यासमोर आला होता. तो मी आव्हान म्हणून स्वीकारले आणि त्यात मला यशही आले. मग दिग्दर्शनाचा प्रयत्न करून पाहूयात, असा विचार करून ‘पोश्टर बॉईज’च्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य हाती घेतले असल्याचे त्याने सांगितले. चित्रपटातून अभिनय केल्यानंतर कंटाळा आला की मग दिग्दर्शन किंवा इतर गोष्टींकडे वळायचे, हा विचार आपल्याला पटत नाही. जे करायची इच्छा आहे ते आत्ताच केले पाहिजे, असे सांगणारा श्रेयस सध्या तीन चित्रपट एकाच वेळी सांभाळतो आहे. मराठीतील पहिला सुपरहिरो म्हणून त्याचा ‘बाजी’ यावर्षी प्रदर्शित होतो आहे. सिक्वलपटात दिलीप प्रभावळकर, ह्रषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे तिन्ही ‘पोश्टर’ हिरोच कथा पुढे नेणार आहेत. यावेळीही कथा सामाजिक प्रश्नाच्या अंगानेच पुढे जाणार असली तरी कथेपासून ते निर्मितीपर्यंतची मांडणी भव्य आणि व्यापक असेल, अशी माहिती श्रेयसने दिली. ‘पोश्टर बॉईज’च्या सिक्वलपटाची निर्मिती ‘दार मोशन पिक्चर्स’ करणार आहे.
रेश्मा राईकवार, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा