सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा झाल्यानंतर अर्थात वयाच्या ८१ व्या वर्षांनतर माणूस थकतो. काही शारीरिक व्याधींनी तो त्रासलेला असतो. मात्र काही जण त्याला अपवाद असतात. मात्र काही जण या वयातही उत्साह आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद कायम ठेवून असतात. शारीरिक दुर्बलतेवर जिद्दीने मात करून ते जोमाने उभे राहतात. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू हे त्यापैकीच. वयाच्या ८६ व्या वर्षी डॉ. लागू यांनी ‘नागरिक’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.
काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर सादर झालेल्या ‘मित्र’या नाटकात डॉ. लागू यांची भूमिका होती. त्यानंतर काही चित्रपटात ते ‘पाहुणा कलाकार’ म्हणून विशेष भूमिकेत दिसले होते. दीर्घ कालावधीनंतर ‘नागरिक’ चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. लागू यांचे मोठय़ा पडद्यावर पुनरागमन होत आहे आणि विशेष बाब म्हणजे हा चित्रपटही राजकीय विषयावरील आहे. ‘सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. त्याचा आनंद पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेता येणार आहे.
१८ आणि १९ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवात ‘नागरिक’ हा चित्रपट पहिल्यांदा दाखविला जाणार आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन चव्हाण हे असून कथा व संवाद डॉ. महेश केळुस्कर यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई असून पटकथा डॉ. केळुस्कर व जयप्रद यांची आहे. चित्रपटात डॉ. लागू यांच्यासह सचिन खेडेकर, दिलीप प्रभावळकर, मिलिंद सोमण, नीना कुलकर्णी, सुलभा देशपांडे हे कलाकार आहेत.
आम्हाला तुम्हीच हवे आहात
या वयात डॉ. लागू चित्रपटात काम करतील की नाही याविषयी शंका वाटत होती. मी त्यांना चित्रपटाची संहिता वाचायला दिली. चित्रपटातील या भूमिकेसाठी आम्हाला तुम्हीच हवे आहात, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी माझे वय आणि शारीरिक अवस्थेची तुम्हाला कल्पना आहे, असा प्रश्न केला. त्यावर संहिता वाचा, विचार करा आणि मग निर्णय द्या, अशी विनंती आम्ही त्यांना केली. काही दिवसांनी त्यांना विचारले तेव्हा, मी काम करायला तयार आहे, संहिता वाचतानाच माझ्या डोक्यात भूमिकेचा विचार सुरू झाला. मी आता नाही म्हणणार नाही, असे सांगून काम करण्यास होकार दिला.
दिग्दर्शक जयप्रद देसाई