‘दिल तो बच्चा है जी’ चित्रपटानंतर बॉलीवूडमधून गायब झालेली अभिनेत्री श्रुती हसन तिच्या ‘रमैया वस्तावैय्या’ आणि ‘द डे’ चित्रपटांद्वारे बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. श्रुती हसनने अद्याप बॉलीवूडमध्ये खास ठसा उमटवलेला नाही. मात्र, आगामी चित्रपट ‘रमैया वस्तावैया’ चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यास यशस्वी होते का? हे लवकरच कळेल. हा चित्रपट प्रभूदेवाच्या तेलगुतील एका सुपरहिट चित्रपटाचा रिमेक असून यात ग्रामीण लाजाळू मुलगी आणि शहरी मुलामधील रोमान्स दाखविला आहे.
” चित्रपटाची कथा मला माहित होती आणि त्यातील भूमिकेशी मी परिचित होते. दक्षिण भागातील प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला होता. त्यामुळे मला या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. निर्माता कुमार तौरानी यांचा मुलगा गिरीश कुमार या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे,” असे श्रुती म्हणाली. चित्रपटाच्या ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिणात्य लोकांनी मला ग्रामीण मुलीच्या भूमिकेत पाहिले आहे. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत मी पहिल्यांदाच या भूमिकेत दिसणार आहे. मनमोहक संगीत आणि रोमॅन्टिक दृश्ये हे या चित्रपटाचे महत्वाचे भाग आहेत, असेही ती म्हणाली.