सध्या बॉलिवूडमध्ये स्टार कलावंतांच्या कन्या आणि पुत्रांचा बराच बोलबाला आहे. अफलातून अभिनय, उत्तम नृत्यकौशल्य आणि देखणा चेहरा या जोरावर ८० च्या दशकापासून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या कमल हसनची कन्या श्रुती हसन सध्या बॉलिवूडमधून गायबच झालीये. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ती रमली असून बॉलिवूडची तिला धास्ती वाटतेय की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.  याचे कारण म्हणजे मधुर भांडारकरच्या ‘दिल तो बच्चा है जी’ आणि आणखी एका ‘लक’ नावाच्या सिनेमांतून
तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले खरे; परंतु हे दोन्ही चित्रपट गल्लापेटीवर फारसे यशस्वी न ठरल्याने श्रुती हसन म्हणे तरूणाईच्या ‘दिलों की धडकन’ बनू शकली नाही. म्हणून की काय बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागेल हे तिला समजले असावे. म्हणूनच बॉलिवूडकडे पाठ फिरवून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जमेल तेवढे काम करावे, असा विचारही तिने केला असावा. परंतु, यावर श्रुती हसन मात्र म्हणतेय की अजून मी  नवीन आहे, बॉलिवूडमध्ये येणे मी टाळतेय असे मात्र प्रेक्षकांनी वाटून घेऊ नये. अजून मी लहान आहे, कारकिर्दीची सुरुवात आता कुठे झाली आहे, असेही तिचे म्हणणे आहे.  प्रभुदेवाच्या आगामी ‘रमया वस्तावय्या’ आणि निखिल अडवानीच्या ‘डी-डे’ या चित्रपटांमधून बॉलिवूडच्या प्रेक्षकांसमोर मी झळकणार आहे, असे श्रुतीने सांगितले. बॉलिवूड असो की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आपण आपला ठसा कुठेच उमटविलेला नाही, असे नम्रपणे कबूल करून श्रुती म्हणतेय की अजून मी लहान आहे, अजून बरेच काम करायचे आहे. दाक्षिणात्य चित्रपट करीत असल्यामुळे त्यात व्यस्त आहे, बॉलिवूडमध्ये आगामी
दोन चित्रपटांतून झळकणार आहेच. बॉलिवूडलाच मी ‘इंडियन सिनेमा’ म्हणते त्यामुळे बॉलिवूडशिवाय दुसरीकडे जाणार कुठे, असा उलट प्रश्न तिने केला आहे. सारिकाच्या चेहऱ्याची ठेवण आणि कमल हासनचे अभिनयगुण श्रुती हसनला बॉलिवूडमध्ये तारू शकतील, अशी आशा करायला हरकत नाही.