मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये श्रुती मराठेची (Shruti Marathe) गणना केली जाते. नाटक, मालिका, जाहिरात व चित्रपट अश्या अनेक माध्यमांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतदेखील श्रुतीने काम केले आहे. ‘राधा ही बावरी’ या गाजलेल्या मालिकेतून श्रुती लोकप्रिय झाली. श्रुती तिच्या मनमोहक सौंदर्याने कायमच सर्वांचे लक्ष वेधते. पण, एकेकाळी तिला तिच्या वजनावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
वाढलेल्या वजनामुळे श्रुतीला सोशल मीडियावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत असत. याबद्दल तिने आता भाष्य केलं आहे. श्रुतीने सोनाली खरेच्या ‘वॉव विथ सोनाली’मध्ये तिच्या वाढत्या वजनावरून झालेल्या ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी श्रुतीने वजनावरच्या लोकांच्या कमेंट्सचा मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामाबद्दलही सांगितलं. याबद्दल श्रुती असं म्हणाली की, “वजन वाढलं तेव्हा त्याचा त्रास नक्कीच झाला होता, लोक सतत मी कशी दिसते याबद्दलच्या प्रतिक्रिया देत होते.”
यापुढे ती म्हणाली की, “तुम्हाला कसं वाटतंय किंवा काही इतर समस्या आहेत का? हे न समजता तुम्ही जसे दिसता त्यावर ते थेट कमेंट्स करतात, त्यामुळे याचा बऱ्याचदा तुमच्यावर परिणाम होतो. इतके वर्षे जेव्हा सतत लोक म्हणत असतात ना तू जाड आहेस… तू जाड आहेस… तू जाड आहेस… तेव्हा त्याचा मानसिकदृष्ट्या त्रास होतोच; पण आता जेव्हा लोक म्हणतात की काडी झाली आहेस, तर त्याचा मला आनंद होतो.”
पुढे श्रुतीने सांगितलं की, “मला याचा एक वेगळा आनंद होतो की, येस, शेवटी मी हे ऐकत आहे. किती बारीक झाली आहेस, किती हाडकुळी झाली आहेस किंवा किती अशक्त झाली आहेस… हे सगळं ऐकताना आता मला बरं वाटतं. कारण १५-२० वर्षे तुम्ही सतत जाड आहेस, जाड आहेस हे ऐकता ना तेव्हा हाडकुळी आहेस, बारीक आहेस किंवा अशक्त आहेस हे सगळं ऐकताना तुम्हाला कौतुक वाटायला लागतं.”
दरम्यान, श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘राधा ही बावरी’शिवाय ‘भागो मोहन प्यारे’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘एकापेक्षा एक’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसंच काही चित्रपटांतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच ती निर्माती म्हणूनसुद्धा जबाबदारी पार पाडत आहे.