मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील नवरोजी हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता आणखी एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

लग्नातील धावपळीला आणि नवरोजींच्या स्वागताची लगबग दाखविणारं ‘नवरोजी’ हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भावनिक साद घालणारं ‘ओ साथी रे हे’ गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे. उत्कृष्ट संगीत, गाण्याचे शब्द आणि त्याला मिळालेली सुबोध श्रुती यांच्या भुरळ घालणाऱ्या अभिनयाची साथ यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस पडत आहे.

काही कारणास्तव एकमेकांपासून दूर गेलेल्या सुबोध आणि श्रुती यांच्यावर भाष्य करणार हे भावनिक गाणं चित्रपटाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जातं. या गाण्यात सुबोध – श्रुतीच्या नात्यात आलेला दुरावा पाहायला मिळतो. प्रेमीयुगुलांना आकर्षित करणार हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला बेला शेंडेचा आवाज लाभला आहे.

‘शुभ लग्न सावधान’ हा विवाहसंस्थेवर भाष्य करणारा अस्सल कौटुंबिक चित्रपट असून यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, सतीश सलागरे , प्राची नील, शिल्पा गांधी मोहिले, अभय कामत, ज्योती निवडुंगे, अमीत कोर्डे, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे.

 

Story img Loader