मराठीसोबतच हिंदी मालिका आणि सिनेमांमधून अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालंय. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेकांना एक मेसेज जात असून त्यात एक लिंक आहे. या लिंकमध्ये अश्लिल फोटो असल्याचं म्हंटलं आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
शुभांगी गोखले यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्या चाहत्यांना तसचं त्यांना फॉलो करणाऱ्यांना आणि मित्र मैत्रिणींना सावध केलं आहे. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “पुन्हा एकदा माझं अकाऊंट हॅक झालंय. माझ्या नकळत सगळ्यांना एक लिंक जात आहे. कृपया ती ओपन करू नका. मी सायबर सेलशी बोलले आहे. त्यांनी सगळ्यांसाठी मेसेज पाठला आहे” असं त्या म्हणाल्या आहेत.
पुढे या पोस्टमध्ये त्यांनी माहिती दिली. “हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं…हा ट्रॅप आहे यात अडकू नका.” अशी माहिती देत त्यांनी सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
लग्नापूर्वी शारीरिक संबंधाविषयी रेखा यांनी केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत
शुभांगी गोखले यांच्या अकाऊंटवरून मेसेंजर मधून जात असलेल्या मेसजमध्ये एक लिंक आहे. या लिकंवर क्लिक केल्यास युजरनेम आणि पासवर्ड अशी माहिती पूर्ण केल्यास एक फेक साइट ओपन होते. त्यानंतर लिंक क्लिक करणाऱ्याच्या प्रोफाईलवरून अश्लिल फोटो शेअर केले जात आहेत.
दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून सायरब सेलने तपास सुरु केला आहे.