एखाद्या कलाकारासाठी त्याला त्याच्या चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्याकडून होणारं कौतुक हे कायमच खास असतात. प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या प्रेमासाठीच मेहनत करत असतो आणि कलाकाराला त्याचे चाहते या प्रतिक्रिया जेव्हा प्रत्यक्षात देतात, तेव्हा कलाकारही भारावून जातो. चाहत्यांनी केलेल्या अशाच एका अनपेक्षित गोष्टीमुळे मराठी अभिनेता भारावून गेला होता आणि हा अभिनेता म्हणजेच शुभंकर तावडे (Shubhankar Tawde).
शुभंकर तावडेला त्याच्या नाटकाच्या प्रयोगानंतर काही महिलांचा ग्रुप भेटायला आला आणि यावेळी त्यांनी दिलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे शुभंकर भारावून गेला. याबद्दल स्वत: शुभंकरनेच सांगितलं आहे. ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यात त्याने याबद्दल असं म्हटलं की, “स्टेजवरच्या किश्श्यांपेक्षा आम्हाला लोक भेटायला येतात, तेव्हाचे किस्से अनेक आहेत. विविध लोक खूप उत्सुकतेने भेटायला येतात. ते कलाकारांना पहिल्यांदाच भेटत असतात आणि त्यांनी नाटकही पाहिलेलं असतं, त्यामुळे त्यांची उत्सुकता खूप असते.”
यापुढे तो म्हणाला की, “आम्ही कोल्हापुरात शो करत होतो आणि तिकडे एक वीस-पंचवीस बायकांचा पूर्ण ग्रुप आला होता. तेव्हा आम्हाला असं झालं की ते ‘विषामृत’साठी आले असतील, कारण त्यात प्रियदर्शिनी इंदलकर आहे आणि तिच्या शोमुळे तिचा चाहतावर्ग आहे. या सगळ्या बायका तिला सोडून माझ्याकडे आल्या, तेव्हा मी त्यांना साधारण नमस्कार वगैरे केला. मग त्यांनी मला लाजून तुम्ही पोस्टर किंवा फोटोमध्ये जितके छान दिसता, त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच छान दिसता, ओह माय गॉड” असे म्हटले.
यापुढे शुभंकरने सांगितलं की, “आयुष्यात मला माझ्या प्रेयसी किंवा ज्या पूर्व प्रेयसी, ज्यांनी दाद दिल्यानंतर मी जितका लाजलो नसेन त्यापेक्षा मी त्या दिवशी अवघ्या काही क्षणांत लाजलो. कारण एवढ्या सगळ्या बायका जेव्हा मला हे येऊन म्हणतात, ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं. ती भावना माझ्यासाठी खूप खास होती, त्यामुळे मलाही मनापासून आनंद होतो. जेव्हा जेव्हा मला ही घटना आठवते, तेव्हा तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येतं.”
दरम्यान, शुभंकर तावडे हा ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट याशिवाय ओटीटीवरील काही सीरिजमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सध्या तो रंगभूमीवर ‘विषामृत’ नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.