‘स्टार प्रवाह’वरील ‘लक्ष्य’ मालिकेतील प्रसिद्ध युनिट ८च्या अधिकाऱ्यांमध्ये इन्स्पेक्टर रेणुका राठोड या नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश झाला आहे. हिंदी आणि मराठी मालिकोंमधून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री श्वेता शिंदे रेणुकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तरुण, तडफदार आणि कडक शिस्तीच्या रेणुका राठोडमुळे ‘लक्ष्य’ची टीम आणखीनच बळकट झाल्याचे दिसून येणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्पेक्टर रेणुका राठोडचा वऱ्हाडी ठसका भल्याभल्या गुन्हेगारांची झोप उडवणार आहे. युनिट ८ची टीम आता विशेष प्रकरणे हातात घेणार आहे. ‘दहशतवादविरोधी लढा’, ‘चांदीची तस्करी’ अशी मोठमोठी प्रकरणे या टीमकडे देण्यात आली आहेत. आत्तापर्यंत मुंबईपुरती मर्यादित असणाऱ्या या टीमने कार्यकक्षाही विस्तारली असून, महाराष्ट्र पोलिसांनी हाताळलेली विविध शहरांतील प्रकरणे युनिट ८ची टीम सोडवताना दिसणार आहे. कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे अशा वेगवेगळ्या शहरांत युनिट ८ पोहोचणार आहे. त्यामुळे पोलिसांची थरारक अ‍ॅक्शनदृश्ये आणि वेगवेगळे स्टंट्स आगामी भागांत पाहायला मिळणार आहेत.
याशिवाय, जीपीएस तंत्रज्ञान, फोरेन्सिक लॅबही पुढच्या भागात अधिकाऱ्यांच्या दिमतीला असणार आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने स्त्री व्यक्तिरेखांना नेहमीच प्रेरणादायी भूमिकेत दाखवले आहे. इन्स्पेक्टर रेणुका राठोड हे याचेच पुढचे पाऊल आहे, असे ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख जयेश पाटील यांनी सांगितले. ११ डिसेंबरपासून रोज रात्री दहा वाजता ‘लक्ष्य’चे नवे भाग प्रसारित होणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta shinde in lakshya television serial