‘श्यामची आई’ या सुजय डहाके दिग्दर्शित आणि अमृता अरुण राव निर्मित चित्रपटात अभिनेता ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार आहे. हरहुन्नरी ओमने याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा सर्वार्थाने वेगळी अशी ही भूमिका ठरणार आहे.

 निर्मात्या अमृता अरुण राव यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने पछाडलेला, राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या दिग्दर्शक सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटात साने गुरुजींची भूमिका कोण करणार? याबाबत सर्वानाच कुतूहल होतं. आता ओमच्या साने गुरुजींच्या लुकमधील पोस्टरने हे रहस्य उलगडलं आहे. नेहमीच हटके भूमिका करणाऱ्या ओमने पुन्हा एक नवं आव्हान स्वीकारलं आहे. याआधी त्याने अँग्री यंग मॅन शैलीतील भूमिका केली होती. आता साने गुरुजींसारखी संयत व्यक्तिरेखा त्याला साकारायची आहे. ‘ओम भूतकर एक कसलेला आणि चतुरस्र अभिनेता आहे. त्याने यापूर्वी नेहमीच वेगवेगळय़ा छटा असलेल्या व्यक्तिरेखांना अचूक न्याय दिला आहे. संवादफेकीपासून देहबोलीपर्यंत अभिनयाच्या प्रत्येक अंगात त्याने  आपलं प्रभुत्व सिद्ध केलं आहे. याच बळावर ओमने बऱ्याच पुरस्कारांवरही आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे. साने गुरुजींच्या व्यक्तिरेखेचा विचार करत असताना सर्व बाजूंनी परिपूर्ण असणाऱ्या अभिनेत्याची गरज होती. या व्याख्येत ओम अचूक बसत असल्याने साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्याची निवड केली,’ असं मत सुजय डहाकेनं व्यक्त केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळाच ओम पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा कृष्णधवल युगातील चित्रपट अनुभवता येणार आहे.

Story img Loader