अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनन्या पांडे, धैर्य कारवा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा आधुनिक नातेसंबंधांवर आधारित आहे. चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत यांचे बरेच इंटीमेट सीन आहेत. जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या कलाकारांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सिद्धांतनं त्याच्या काकांचा एक किस्सा शेअर केला होता. ज्यावर सर्वांनाच हसू आवरेनासं झालं.
कपिल शर्मानं या एपिसोडचा एक व्हिडीओ त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटातील कलाकार धम्माल करताना दिसत आहेत. जेव्हा या शोमध्ये सिद्धांत आणि दीपिका यांच्या लिप-लॉकबद्दल बोललं जात होतं त्यावेळी सिद्धांतनं एक मजेदार किस्सा शेअर केला. तो म्हणाला, ‘जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी माझ्या गावच्या काकांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या बाबांना भोजपुरीमध्ये विचारलं, ”भई इक बात हमरा के। ई जौन किसिंग भईल बा, स्पर्श भईल बा कि ना? या ऐसे बीच में शीशा रखा ला?”
सिद्धांत पुढे म्हणाला, ‘म्हणजे ते म्हणत होते, ‘यांनी हे खरंच असं किस केलं की दोघांच्यामध्ये आरसा होता? त्यावर माझे बाबा म्हणाले, आता यावर मी काय बोलू? त्यानं आम्हाला चित्रपटाची कथा सांगितली आणि मग आम्ही आपापल्या खोलीत निघून गेलो. ट्रेलर पाहण्यासाठी. तो करतोय काहीतरी.’ हे ऐकल्यावर कपिल सिद्धांतला म्हणाला, ‘तुझ्या काकांचं वय काय आहे?’ यावर सिद्धांतला खूप हसू येतं. तो हसत हसत सांगतो, ‘असेल ५० वर्षं’ सिद्धांतच्या उत्तरावर कपिल म्हणतो, ‘काका कानपुरच्या आसपास बरीच चांगली ठिकणं आहेत, फिरून या अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका.’
दरम्यान या ‘गहराइयां’ चित्रपटाबाबत बोलायचं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्राचं आहे. तर निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं केली आहे. दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतच या चित्रपटात रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.