‘स्टार प्रवाह’वर येत्या २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त होतं ते सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या वाढदिवसाचं. रिअल लाइफमधली माय-लेकाची ही जोडी रिल लाईफमध्येही आई-मुलाच्या भूमिकेत आहे. ‘जिवलगा’ या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि त्याची आई पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सिद्धार्थसाठी ही खूप आनंददायी गोष्ट आहे, आणि म्हणूनच आईचा ५२ वा वाढदिवस यादगार करण्यासाठी त्याने ‘जिवलगा’च्या सेटवर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. सिद्धार्थच्या या प्लॅनमध्ये ‘जिवलगा’च्या संपूर्ण टीमने त्याला मदत केली आणि सेलिब्रेशनची रंगत आणखी वाढली.
सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमकडूम मिळालेलं हे खास सरप्राइज पाहून सिद्धार्थची आई भारावून गेली होती. आयुष्यातले काही क्षण न विसरता येणारे असतात. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय वाढदिवस आहे. हे आनंदाचे क्षण मला दिल्याबद्दल सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमचे आभार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पडद्यामागे घडणाऱ्या या रंजक घडामोडींसोबतच मालिकेतली रंजक गोष्ट लवकरच प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ‘जिवलगा’ २२ एप्रिलापासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.