सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रावर चित्रीत झालेले काला चष्मा हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या बार बार देखो या चित्रपटात हे गाणे पाहायला मिळाले. त्यानंतर या गाण्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. तब्बल ६ वर्षांनी हे गाणे पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आले आहे. नुकतंच भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी या गाण्यावर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे ते गाणे चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बार बार देखो या चित्रपटातील काला चष्मा हे गाणं कोणी लिहिलंय असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नुकतंच याचे उत्तर समोर आलं आहे. काला चष्मा या गाण्यावर अनेक कलाकार, क्रिकेटपटू ते सर्वसामान्य नागरिक रिल व्हिडीओ बनवताना दिसत आहे. या गाण्यावरील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही या गाण्याचा चर्चा पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काला चष्मा हे गाणे एका पोलिसाने लिहिले आहे. पंजाब पोलिसातील हेड कॉन्स्टेबल अमरिक सिंह शेरा हे या गाण्याचे लेखक आहेत. कपूरथला जिल्ह्यातील इंटर सर्व्हिस ट्रेनिंग सेंटरमध्ये पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (PSO) म्हणून तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल अमर सिंग शेरा यांनी लिहिलेले ‘काला चष्मा’ गाणं जगभरात नेटकऱ्यांना भूरळ घालत आहे. हे गाणं त्यांनी १९९० मध्ये शिक्षण घेत असताना लिहिले होते. त्यावेळी ते अवघ्या १५ वर्षाचे होते.
अमरिक यांच्या परवानगीनंतर बार बार देखो या चित्रपटात हे गाणं वापरण्यात आले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात काला चष्मा हे गाणे कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. त्यावेळी ‘काला चष्मा’ या गाण्यासाठी अमरिक यांना फक्त ११ हजार रुपये मिळाले होते. पण काही वर्षांनी हे गाणे इतके हिट होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. दरम्यान सध्या हे गाणे चांगलेच हिट ठरताना दिसत आहे.