तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, झी युवा वाहिनीवर ‘झी युवा सन्मान’ हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. येत्या शनिवारी १४ नोव्हेंबरला ‘झी युवा’ वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
तरुणांच्या या सन्मान सोहळ्यात मराठी कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती होती. उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास परफॉर्मन्सेस सुद्धा या सोहळ्यात सादर करण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या एका दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चांद लावले. सिद्धार्थने त्याच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्समधून पोलिसांना मानवंदना दिली.
आपण सारे वर्क फ्रॉम होम करत असताना पोलीस बांधव स्वतःची आणि परिवाराची चिंता न करता लोकांच्या सेवेत दिवसरात्र तत्पर आहेत. त्यांच्या या अविरत कार्याला मानवंदना देणारा सिद्धार्थ जाधवचा एक धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना झी युवा सन्मान या सोहळ्यात पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा विशेष सन्मान या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.