ईदला म्हणजे 13 मे ला सलमान खानचा ‘राधे’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. ट्रेलरमध्ये मोठी स्टारकास्ट पहायला मिळतेय. मात्र ट्रेलरमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव. या सिनेमांमध्ये सिद्धार्थची देखील एका खास भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सिद्धार्थ जाधवने काही दिवसांपूर्वीच ‘राधे’ सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. लोकसत्ताशी संवाद साधताना सिद्धार्थने त्याच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल सांगितलं असलं तरी यावर फारसं बोलणं त्याने टाळलं. यामागचं कारण म्हणचे सध्याची परिस्थिती अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे असं म्हणत सिद्धार्थ भावूक झाला.
हे सर्व कधी थांबणार असा प्रश्न पडतो
देशातील सध्याच्या करोनाच्या स्थितीवर बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “गेल्या वर्षीपेक्षा यंदाची स्थिती अधिक भीषण आहे आणि याचं खूप वाईट वाटतं. सध्या अशा घडामोडी घडतायत, अशा बातम्या समोर येत आहेत की मला खूप मोठे धक्के बसत आहेत. वर्ष झालं रंगभूमीवरचे प्रयोग बंद आहेत, लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांच आणि मालिकांच शूटिंग वेळोवेळी ठप्प पडतंय, त्यात गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टी आणि कलाक्षेत्रात अनेक तरुणांचा करोनामुळे निधन झालं. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर अशा उत्तम कलाकारांसोबतच अनेकांना करोनामुळे जीव गमवावा लागला. त्यातच नाशिकमधील हेलावून टाकणारी घटना, ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू अशा सर्व बातम्या पाहून हे सर्व कधी थांबणार असा प्रश्न पडतो. या घटना हादरवून टाकणाऱ्या आहेत.”
‘भावपूर्ण श्रद्धांजली’ हा शब्द किती वेळा वापरायचा!
वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना सिद्धार्थ म्हणाला, ” करोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. प्रत्येकाला याची मोठी झळ बसलीय आणि त्याचं खूप दुःख वाटतं. खरं सांगायचं तर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ हा शब्द आता किती वेळा वापरू याचंही वाईट वाटू लागलं आहे. दर दोन दिवसांनी श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे, याहून वाईट काय असू शकतं? कला क्षेत्राचं मोठं नुकसान झालंचं आहे. मात्र वैयक्तिक आपल्या प्रत्येकाचं मोठं नुकसान झालंय. जे भरून निघणं शक्य नाही. मराठी सिनेसृष्टी हे आमचं कुटुंबच आहे आणि कुटुंबातील व्यक्तींचं असं अचानक जाणं वेदनादायी आहे. या सर्व दु:खी वातावरणात ‘राधे’ सिनेमाबद्दल बोलण्याची इच्छा देखील होत नाही.” ‘राधे’ हा सिनेमा करिअरमधील महत्वाचा भाग असला तरी सध्याची परिस्थिती जास्त भीषण असल्याचं सिद्धार्थ म्हणाला.
..आणि मराठी कलाकारांवर बोट उगारलं जातं
करोनाच्या या कठीण स्थितीत बॉलिवूडचे अनेक कलाकार मदतीसाठी पुढे येत आहेत. अशात मराठी कलाकार कश्या प्रकारे योगदान देत आहेत? या प्रश्नावर सिद्धार्थने खंत व्यक्त केली. तो म्हणाला, ” मराठी कलाकार कायम नागरिकांच्या मदतीसाठी धावून जातात. कोल्हापूरात आलेला पूर असो किंवा राज्यात येणारी संकट अशा अनेक वेळेला आम्ही रस्त्यावर उतरून, गावोगावी जाऊन मदत केलीय. आम्ही अनेकजण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरूनही फक्त करोनाशी संबधित पोस्ट शेअर करत आहोत. कुणाला बेड हवाय तर कुणाला ऑक्सिजन. कुठे काय उपलब्ध आहे याची आमच्याकडे आलेली माहिती देखील आम्ही शेअर करत आहोत. जेणेकरून एखाद्या गरजूला मदत होईल. मी देखील सोशल मीडियाचा वापर करोनाशी संबंधित पोस्टसाठी करत आहे. अनेक मराठी कलाकार आपापल्या परीने विविध प्रकारची मदत करत आहे. यात प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे असे अनेक कलाकार विविध रुपात मदत करत आहेत. कुणी रक्तदान शिबीरं घेत आहे. कुणी रुग्णांच्या जेवणाची सोय करत आहे. मराठी कलाकार फक्त त्यांनी केलेल्या मदचीचा गाजावाजा करत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेकदा लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. मात्र ही बाब साफ चुकीची आहे.” असं सिद्धार्थ म्हणाला. एखाद्या बॉलिवूड कलाकाराने मदत केली की मराठी कलाकारांवर बोट उगारलं जातं . मराठी कलाकार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातो याची खंत वाटत असल्याचं सिद्धार्थ म्हणाला.
यावेळी जे बडे सेलिब्रिटी लोकांच्या मदचीला धावून जात आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचं सिद्धार्थ म्हणाला आहे. “सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या मदतीच्या पोस्ट झळकतात. जे मदत करून फोटो टाकत आहेत. ते काही चुकीचं करतात असं नाही. त्यांचा आदरचं आहे. मात्र मदत ही कोणत्याही स्वरूपातली असू शकते. मदतीला मोल नाही. त्यामुळे किमान लोकांनी मराठी कलाकारांना दोष ठेवू नये” अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली.
संधी सोडण्यासारखी नव्हती
पुढे ‘राधे’ सिनेमाबद्दल सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ” या सिनेमात माझी एक लहानशी मात्र धमाल भूमिका आहे. धुरळा सिनेमानंतर मला ‘राधे’ साठी विचारण्यात आलं. कलाकाराठी मिळालेल्या संधीच सोनं करणं महत्वाचं असंत. मला संधी मिळाली आणि मी ती सोडली नाही. या सिनेमातली माझी भूमिका एक छोटीशी असली तर ते खूप इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला सिनेमात पाहायला मिळेलच. मी लहानपणापासूनच प्रभूदेवाचा फॅन आहे. नव्वदच्या दशकात आम्हा सर्वांना त्याच्या ‘हम से मुकाबला’ गाण्याने वेड लावलं होतं. तेव्हा तो फक्त एक बेस्ट डान्सर होता. त्याचा डान्स पाहून शाळेत आम्ही सराव करायचो. मी तर त्याच्या सारखी बॅक फ्लिप मारायला शिकलो होतो. त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आलो. सिनेमा करू लागलो. तोही दिग्दर्शक झाला. त्यात मला अशी संधी आली ज्यात सलमान खान आहे. प्रभूदेवा सिनेमाचा दिग्दर्शक आहे त्यामुळे अर्थातच संधी सोडण्यासारखी नव्हती.”
श्वास घेणं, जगणं हे जास्त महत्त्वाच आहे
‘राधे’ सिनेमाचा भाग होता आलं याचा आनंद असला. तरी सध्या भोवतालची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. मनोरंजन हा आयुष्याचा भाग असला तरी सध्या आरोग्य जपणं महत्वाचं आहे. या परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सध्या लोकांना धीर देणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांचं मनोबल वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत.
सध्याच्या काळात मला कोणालाही दोष द्यायचा नाही फक्त मायबाप रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी काळजी घेणं गरजेचे आहं कारण सध्याच्या काळात श्वास घेणं, जगणं हे जास्त महत्त्वाच आहे…