बॉलीवूडच्या रूपेरी पडद्याची गणिते ही नेहमीच ‘स्टार व्हॅल्यू’वर अवलंबून असतात. स्टार कलावंतांच्या नावावर आणि लोकप्रियतेवर सिनेमा लोकप्रिय होणार किंवा नाही हे ठरते. अर्थात केवळ स्टार कलावंतांना घेऊन सिनेमा तरून जाऊ शकत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. परंतु, तरीसुद्धा तीन खानांच्या सोबत झळकलेल्या अभिनेत्री नंतर बडय़ा स्टार कलावंत बनतात असेही दिसून आले आहे. त्यापैकीच एक सौंदर्यवती कतरिना कैफ आहे. परंतु, आगामी एका सिनेमात कतरिना चक्क सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करणार आहे, अशी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
एखादी जोडी रूपेरी पडद्यावर सुपरहिट झाली की त्याच जोडीला घेऊन अनेक चित्रपट करण्याची प्रथा आता मोडीत निघू लागली आहे. सलमान खानसोबत एक चित्रपट केला की हल्ली त्या नटीला बॉलीवूडची कवाडं एकदम खुली होतात आणि भराभर चित्रपट मिळू लागतात. कतरिना कैफच्या कारकिर्दीलाही सलमान खानचा वरदहस्त मिळाला होता. आता ती बडी स्टार कलावंत बनली आहे. परंतु, तरीसुद्धा सिद्धार्थ मल्होत्रासारख्या एक-दोन चित्रपट केलेल्या कलावंतासोबत कतरिना जोडी जमवणार आहे.
फरहान अख्तर, धर्मा प्रॉडक्शन्स यांनी एकत्र येऊन एक प्रेमकथा पडद्यावर आणण्याचे ठरविले असून फरहान अख्तरची साहाय्यक दिग्दर्शक नित्या मेहरा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा- कतरिना कैफ ही नवीन जोडी आणून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे आम्ही करणार आहोत, असे फरहानने म्हटले आहे.
यात सिद्धार्थ मल्होत्रा मात्र ‘लकी’ ठरला आहे. कारण पदार्पणात आलिया भट, नंतर परिणीती चोप्रा आणि श्रद्धा कपूर या त्याच्यासारख्याच नवोदित सौंदर्यवतींसोबत काम केल्यानंतर त्याला थेट कतरिना कैफसोबत रूपेरी पडद्यावर ‘रोमान्स’ करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच सिद्धार्थ मल्होत्राची ‘स्टार व्हॅल्यू’ वधारणार आहे हे नक्की. बॉलीवूडची ‘स्टार व्हॅल्यू’वर आधारित गणिते, आडाखे काहीही असले तरी कतरिना-सिद्धार्थ या नव्या जोडीला प्रेक्षक स्वीकारतील का हाच खरा प्रश्न आहे.
रूपेरी पडद्यावर कतरिना कैफ-सिद्धार्थ मल्होत्राची जोडी
बॉलीवूडच्या रूपेरी पडद्याची गणिते ही नेहमीच ‘स्टार व्हॅल्यू’वर अवलंबून असतात. स्टार कलावंतांच्या नावावर आणि लोकप्रियतेवर सिनेमा लोकप्रिय होणार किंवा नाही हे ठरते.
First published on: 12-04-2015 at 12:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra and katrina kaif together in next film