सध्या सर्वांच्याच जीवनात सोशल मीडियाचं महत्त्व वाढलं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सोशल मीडियाची क्रेझ पाहायला मिळते. छोट्या पडद्यावरील कलाकारांपासून बॉलिवूड स्टार्ससुद्धा आता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं आपण पाहतो. या माध्यमातून सेलिब्रिटी चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असतात. त्यावर चाहतेही लाइक्स आणि कमेंट्स देतात. या यादीत आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि जॅकलिन फर्नांडिस अग्रस्थानी आहेत असं म्हणायला हरकत नाही. जॅकलिनला सोशल मीडियाचं इतकं वेड आहे की ती तिच्या मुलांची नावं फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम असं ठेवेल, असं तिचा सहकलाकार सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ आणि जॅकलिनचा ‘अ जंटलमन’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. दोघंही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्याने एकमेकांच्या सवयीही त्यांना कळू लागल्या आहेत. नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सिद्धार्थने नुकतीच हजेरी लावली. ‘जॅकलिनला सोशल मीडियाची इतकी सवय झाली आहे की चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही तिचं सर्व लक्ष सोशल मीडियावर असतं,’ असं सिद्धार्थ यावेळी म्हणाला.

प्रमोशनदरम्यान घडलेला एक गमतीशीर किस्साही त्याने या कार्यक्रमात सांगितला. ‘जॅकी जणू सोशल मीडियाची ब्रँड अॅम्बेसिडरच आहे. प्रमोशनसाठी आम्ही बाईकवरुन जात होतो. त्यावेळी मोबाईलमध्ये ती लाईव्ह व्हि़डिओ शूट करत होती. त्यावेळी तिचं संपूर्ण लक्ष सोशल मीडियावर काय सुरु आहे याकडेच होतं.’

वाचा : ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी हॉटेलमध्ये करायची काम 

सोशल मीडियाबद्दल जॅकलिनला असलेल्या क्रेझबद्दल तो म्हणतो की, ‘सोशल मीडियापासून जॅकीला दूर ठेवलं तर ती मरेल. तिला जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांची नावंदेखील ती फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम ठेवेल असंच मला वाटतं.’ येत्या शुक्रवारी म्हणजेच २५ ऑगस्टला सिद्धार्थ आणि जॅकलिनचा ‘अ जंटलमन’ चित्रपट प्रदर्शित होतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra says jacqueline fernandez kids would be named facebook instagram and twitter