टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांसह मालिका विश्वातील त्याच्या मित्र मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी म्हणजेच ६ सप्टेंबरला सिद्धार्थच्या कुटुंबियांनी त्याच्या चाहत्यांसाठी आणि नातेवाईकासांठी शोकसभेचं आयोजन केलं आहे. ऑनलाईन पद्धतीने देखील ही शोकसभा आयोजित करण्यात आल्याने चाहत्यांना व्हर्चुअली या शोकसभेत सहभाग घेता येणार आहे.
सिद्धार्थ शुक्लाचा जवळचा मित्र अभिनेता करणवीर बोहराने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. करणवीर बोहराने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ शुक्लाच्या शोकसभेची एक पोस्ट शेअर केलीय. एक फोटो शेअर करत त्याने सांगितलं, ” आपला मित्र सिद्धार्थ शुक्लासाठी खास प्रार्थना करण्यासाठी आणि त्याला आशिर्वाद देण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता एकत्र येऊया. त्याची आई रिता शुक्ला आणि त्याच्या बहिणी नीतू, प्रिती आणि शिनावी ताई यांनी शोकसभा आयोजित केली आहे.” असं करणवीरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या शोकसभेत सिद्धार्थच्या लाखो चाहत्यांना सामील होत त्याच्यासाठी प्रार्थना करता येणार आहे.
करणवीर बोहराने शेअर केलेल्या फोटोत चाहत्यांना कशाप्रकारे या शोकसभेत सहभाग घेता येईल याची माहिती देण्यात आली आहे. यात झूम मिटिंगसाठी फोननंबर देखील देण्यात आला आहे.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “राकेश बापट आवडतो पण तो थोडा…”; शमिता शेट्टीने व्यक्त केल्या भावना
सिद्धार्थ शुक्लाची ही शोकसभा सोमवारी ५ वाजता व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सुरु होणार आहे. कोव्हिडचे नियम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सिद्धार्थ शुक्लाचं कुटुंब ब्रह्मकुमारीचे अनुयायी होते त्यामुळे ब्रह्मकुमारीनुसार त्याच्यावर अत्यंसंस्कार आणि सर्व अंत्यविधी पार पडले.