तरुणाईत लोकप्रिय असलेला दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आला आहे. कारण म्हणजे सिद्धूची आई चरण कौर. गेल्या महिन्यात सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी चरण कौर आयव्हीएफच्या मदतीने गर्भवती राहिल्या असून मार्च महिन्यात त्या गोंडस बाळाला जन्म देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सिद्धूच्या चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण पसरलं. काही दिवसांपूर्वी सिद्धूची आई जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं वृत्त आलं. अशातच आता सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे; ज्याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा – मुक्ता-सागरची जोडी झाली सायली-अर्जुनपेक्षा वरचढ, टीआरपीमध्ये यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल
बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धूच्या चाहत्यांना विनंती केली आहे. सध्या सिद्धूच्या आईबाबत ज्या काही अफवा पसरल्या जात आहेत; त्यावर विश्वास ठेऊ नका, अशी विनंती बलकौर यांनी केली आहे. सिद्धूचे वडील फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, “आमच्या कुटुंबाबद्दल सिद्धूचे चाहते नेहमी काळजी करत असतात आणि घेत असतात. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पण सध्या कुटुंबाविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत, त्यावर विश्वास ठेवून नका. जर कुटुंबांसंबंधीत काहीही बातमी असेल तर आम्ही तुम्हाला सांगू.”
दरम्यान, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती. सिद्धू त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस मिळण्यासाठी सिद्धूच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं गेलं. पण आता सिद्धूच्या वडिलांच्या फेसबुक पोस्टमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. नक्की सिद्धूची आई गर्भवती आहे की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण त्यांच्या पोस्टमधील “जर कुटुंबासंबंधीत काहीही बातमी असेल तर आम्ही तुम्हाला सांगू”, या वक्तव्यामुळे सिद्धूच्या चाहत्यांसाठी अजूनही आशा आहे.