दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या घरी गेल्यावर्षी पाळणा हलला. सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणाचाही आधार नव्हता. म्हणून घराला वारस असण्यासाठी सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी दुसऱ्या मुलाचा विचार केला. आयव्हीएफच्या मदतीने सिद्धूच्या आईने गोंडस मुलाला जन्म दिला. शुभदीप असं त्याचं नाव ठेवलं. आज शुभदीप एक वर्षाचा झाला असून त्याचा मोठ्या थाटामाटात पहिला वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

शुभदीप मुसेवालाच्या पहिला वाढदिवस आज, १७ मार्चला मनसामधील हवेली येथे धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी खास उपस्थित राहिले होते. पहिल्या वाढदिवसानिमित्ताने शुभदीपला काळ्या रंगाचा कुर्ता, पायजमा असे कपडे घातले होते आणि फिकट गुलाबी रंगाची पगडी बांधली होती. व्हायरल व्हिडीओमध्ये आई चरण कौरबरोबर शुभदीप केक कापताना दिसत आहेत. दोघांच्या बाजूलाच वडील बलकौर सिंहदेखील उभे आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या जवळपास २२ महिन्यांनंतर चरण कौर यांनी पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला होता. शुभदीपच्या जन्मानंतर बलकौर सिंह यांनी खास पोस्ट शेअर केली होती. त्यांनी शुभदीपबरोबर फोटो शेअर करत लिहिलं होतं, “शुभदीपच्या (सिद्धू मुसेवाला) लाखो-कोट्यवधी चाहत्यांच्या आशीर्वादाने ईश्वराने आम्हाला सिद्धूचा छोटा भाऊ दिला आहे. ईश्वराच्या कृपेनं कुटुंब निरोगी आहे आणि सर्व चाहत्यांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.” सिद्धू मुसेवालाचं मूळ नाव शुभदीप आहे. त्यामुळे तेच नाव सिद्धूच्या आई-वडिलांनी छोट्या मुलाचं नाव ठेवलं. या नावाचा अर्थ एक शुभ दिवा, जो घराचं नाव उज्ज्वल करतो, असा होतो.

दरम्यान, होळी दिवशी शुभदीपचे खूप सुंदर फोटो समोर आले होते. पांढरा कुर्ता, पायजमा आणि त्यावर निळ्या रंगाची पगडी बांधली होती. तसंच शुभदीपच्या गालावर वेगवेगळे रंग लावले होते. यामध्ये शुभदीप खूपच सुंदर दिसत होता. त्यामुळे त्याचे फोटो खूप चर्चेत आले होते.

२९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मनसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाहीतर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्याच्या गाण्यांची अक्षरशः वेडी झाली होती.

Story img Loader