Sidhu Moosewala Brother annaprashan Ceremony : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आणि त्याची गाणी अत्यंत लोकप्रिय होती. २९ मे २०२२ रोजी सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. सिद्धू त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. सिद्धूच्या निधनानंतर त्यांच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला आणि काही महिन्यांपूर्वी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी या मुलाचे नाव ‘शुभदीप’ असे ठेवले, जे दिवंगत गायकाचेही नाव होते. सिद्धू मूसेवालाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या आई-वडिलांनी नुकतेच शुभदीपचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. आता सिद्धूच्या आठ महिन्यांच्या भावाचा अन्नप्राशन सोहळा पार पडला आहे.
सिद्धू मूसेवालाच्या नातेवाइकांनी एका अकाउंटवरून या अन्नप्राशन सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शुभदीपला वेगवेगळे पदार्थ भरवले जात असल्याचे दिसत आहे, ज्यावर सिद्धूच्या चाहत्यांनी भावनिक होत कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा…सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाला पाहिलंत का? गोंडस शुभदीपचा फोटो पाहून चाहते म्हणाले, “Sidhu is Back”
व्हायरल झालेल्या व्हिडीओत शुभदीपला त्याचे आई आणि वडील एका पाटावर बसवून, त्याला अन्न खाऊ घालताना दिसतात. त्याच्यासमोर मिठाई, दूध आणि इतर पदार्थ ठेवलेले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते भावूक झाले आहेत.
सिद्धूचे चाहते कमेंट करीत म्हणाले…
एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, “छोटा सिद्धू.” तर दुसऱ्याने, “क्यूटी… अगदी सिद्धूसारखाच आहे,” असे लिहिले. एका चाहत्याने, “लिजेंड्स कधीच मरत नाहीत,” असे म्हटले आहे. तर काहींनी शुभदीपला प्रत्येक संकटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना केली आहे.
सिद्धू मूसेवालाचे आई-वडील बलकौर सिंह आणि चरण कौर यांना या वर्षी मार्च महिन्यात पुत्रप्राप्ती झाली. शुभदीपच्या जन्माच्या २२ महिन्यांपूर्वी, पंजाबमध्ये सिद्धू मूसेवालाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
सिद्धू मूसेवालाच्या निधनानंतर त्याची आई चरण कौर यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे ५८ व्या वर्षी गरोदर राहून मार्च २०२४ मध्ये मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव शुभदीप, असे ठेवले.