सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला जाऊन काल, २९ मेला दोन वर्ष पूर्ण झाली. २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी सिद्धू आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीतून जात होता. त्याच्या हत्येमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती. त्यामुळे सिद्धूला जाऊन दोन वर्ष झाली असली तरी त्याच्या आठवणी चाहत्यांमध्ये कायम आहेत. आजही त्याची गाणी तितक्याच आवडीने ऐकली जात आहेत.
सिद्धू मुसेवाला त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक होता. त्यामुळे त्याचं असं अचानक जाणं आई-वडील कधीच विसरू शकत नाही. काल, सिद्धूच्या दुसऱ्या पुण्यातिथीनिमित्ताने आई चरण कौर यांनी लेकाच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली; जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
चरण कौर यांनी लिहिलं, “बाळा, आज तुला जाऊन ७३० दिवस, १७५३२ तास, १०५१९०२ मिनट आणि ६३११५२०० सेकंद झालेत. जेव्हा तू घरातून बाहेर पडलास तेव्हा मी प्रार्थना करत होते. पण संध्याकाळ होता होता शत्रूंनी माझा एकुलता एक मुलगा माझ्यापासून हिसकाऊन घेतला. त्यानंतर आयुष्यात असा अंधकार झाला की सूर्योदयाची आशाच नव्हती. पण गुरू महाराजांना तुझ्या विचार आणि स्वप्नांची जाणीव होती. म्हणूनच तुमच्या आशीर्वादाने मला अजून एक मुलगा झाला. तुझे बाबा, तुझा छोटा भाऊ यांना नेहमी तुझी आठवण येत राहिल. अर्थात तुला शारीरिकदृष्ट्या पाहू शकत नाही, पण तुला मी मनातून अनुभवू शकते; जे मी गेले दोन वर्ष करत आले आहे. बाळा, आज खूप कठीण दिवस आहे.”
मुसेवालाच्या आईची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चरण कौर यांनी वयाच्या ५८व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर सिद्धूच्या धाकट्या भावाची पहिली झलक शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. सिद्धू हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस असण्यासाठी सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर या गर्भवती राहिल्या होत्या.
© IE Online Media Services (P) Ltd