ए. आर. रेहमान भारतातील लोकप्रिय संगीतकार व गायक आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. आपल्या संगीताच्या जादूने ए. आर रेहमान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. . पाश्चात्त्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळतो. दरम्यान ए. आर रेहमान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ए. आर. रेहमान एका कार्यक्रमासाठी विदेशात गेले आहेत. ए. आर रेहमान गाडीमधून जात असताना एका विदेशी चाहतीने त्यांची गाडी अडवली. मी तुमची खूप मोठी चाहती आहे असे म्हणत त्या तरुणीने मी तुमच्यासाठी गाणे गाऊ शकते का अशी इच्छा व्यक्त केली. तरुणीच्या या इच्छेचा मान राखत रेहमान यांनी होकारही दिला. त्यानंतर तरुणीने भर रसत्यात गिटार वाजवत ‘माँ तुझे सलाम’ गाणे गायले. ए. आर रेहमान यांनी तरुणीचे कौतुकही केले. एवढंच नाही तर गाणे गाताना तिचा व्हिडीओही रेकॉर्ड केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेक चाहत्यांनी ए. आर रेहमान यांनी त्या चाहतीला दिलेल्या वागणूकीचे कौतुक केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ए.आर रहमान ऑक्सफोर्ड यूनियन डिबेटिंग सोसाइटीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या लहानपणीच एक आठवण सांगितली. रेहमान म्हणाले, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे, त्यामुळे माझी आई म्हणायची की जेव्हा तू इतरांसाठी जगायला सुरुवात करशील तेव्हा असे विचार तुझ्या मनात येणार नाहीत. माझ्या आईकडून मला मिळालेला हा सर्वात सुंदर सल्ला आहे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगता तेव्हा तुमच्या जीवनाला एक अर्थ असतो.”
हेही वाचा- २५०० पाहुणे, ९ प्रकारचे खास पदार्थ अन्…; लग्नानंतर आयरा व नुपूर देणार ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी
ए. आर रेहमान यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आत्तापर्यंत त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत दिले आहे. ऐश्वर्या आणि रजनीकांत यांच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटातील गाण्यांनाही ते संगीत देणार आहेत. तसेच साऊथ सुपरस्टार शिवकार्तिकेयन आणि रकुल प्रीत सिंग यांच्या ‘आयलान’ या तमिळ चित्रपटातील ‘सुरो सुरो’ हे नवीन गाणेही रेहमान यांचेच आहे. राम चरणच्या पुढील चित्रपटालाही रहमान संगीत देणार आहेत. दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘चमकिला’ या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिले आहे.