प्रसिद्ध गायक अदनान सामी त्याच्या अनोख्या गायन शैलीसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ३५ हून जास्त वाद्य वाजवता येणारा अदनान त्याच्या आवाजानेही अनेकांनाच भुरळ घालतो. अदनानच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत की, एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याच्या कलेपेक्षाही खासगी आयुष्यावरच अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. तीनदा लग्न केलेल्या अदनान सामीला दोन मुलं आहेत. पहिल्या पत्नीपासून अदनानला अजान नावाचा एक मुलगा आहे. मुख्य म्हणजे अजान आणि अदनान हे अगदी एकमेकांसारखेच दिसतात.
काही वर्षांपूर्वी अदनान सामी बराच स्थूल होता. त्याचा मुलगा अजानसुद्धा त्याच्याप्रमाणेच स्थूल असून, आता मात्र त्यानेसुद्धा वजन घटवलं आहे. १९९४ मध्ये जन्मलेला अजान सध्या त्याच्या आईसोबत कराचीमध्ये राहतो असं वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केलं. २०१४ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी अजानचं लग्न झालं असून, त्याला एक मुलगाही आहे. अजानची स्वत:ची निर्मिती संस्था आहे. तो अधूनमधून अदनानची भेटही घेत असल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी
एकेकाळी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजेच अदनान सामीप्रमाणे असणारा अजान आता मात्र अगदी फिट असून हाच का तो… असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. सध्या सोशल मीडियावर अजानचे फोटो व्हायरल होत असून, त्यामुळे अदनान सामी आणि त्याचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय नागरिकत्व असो किंवा मग सर्जिकल स्ट्राईकचा विषय. आपल्या प्रत्येक वक्तव्यामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे अदनान चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वीच अदनान चर्चेत आला होता ते म्हणजे त्याच्या मुलीच्या जन्मामुळे. तिसरी पत्नी रोया हिने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. अदनान सध्या रोया आणि त्याच्या लाडक्या लेकीसोबत आनंदात असून, येत्या काही दिवसांमध्ये तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अफगान : इन सर्च ऑफ अ होम’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.