Anuradha Paudwal: ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांना या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार यांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार
संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांना २०२४ या वर्षीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीत आणि गायन क्षेत्रात योगदान दिलं. या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.
अनुराधा पौडवाल यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान
बॉलिवूडमध्ये मृदू आवाजाच्या शैलीने अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांनी सगळ्यांची मनं जिंकली. त्यांच्या खास आवाजामुळे त्या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांचा आवाज अनेकांना आजही आवडतो. भजन गायन, भावगीत, सिनेमातील गाणी अशा विविध क्षेत्रात त्यांनी गाणी गायली आहेत. फक्क देशातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. आशिकी या सिनेमातली सगळी गाणी त्यांच्याच आवाजातली आहेत. जी अजूनही लोकांच्या ओठांवर आहेत. अनुराधा पौडवा यांनी शिवश्लोक गायले. त्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी अनेक गाणी आणि भजनं म्हटली. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गायलेल्या गाण्यांच्या ९० हजार कॅसेट्सची विक्री अवघ्या एका तासांत झाली होती. अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांनी टी सीरिजसाठी गाणी गायली. अनुराधा पौडवाल ( Anuradha Paudwal ) यांच्या निवडीचं श्रेय गुलशन कुमार यांना दिलं जातं.
इतर पुरस्कारांची घोषणा
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबाबत त्यांना गौरवण्यात आलं आहे. संजयजी महाराज पाचपोर यांना मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार जाहीर झाला. तर तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला.
हे पण वाचा- अरिजित सिंहचं ‘हे’ गाणं न आवडल्याने रडल्या होत्या अनुराधा पौडवाल; खुद्द गायिकेने केला खुलासा; म्हणाल्या…
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये १२ पुरस्कारांचा समावेश
राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण १२ पुरस्कारांचा समावेश आहे. नाटक विभागासाठी विशाखा सुभेदार, उपशास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी विकास कशाळकर, कंठसंगीत प्रकारात सुदेश भोसले यांना पुरस्कार जाहीर झाला. लोककला क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना जाहीर झाला आहे. तर शाहिरी क्षेत्रातील २०२४ चा पुरस्कार शाहीर राजेंद्र कांबळे यांना जाहीर झाला आहे. नृत्य वर्गवारीतील पुरस्कार सोनिया परचुरेंना जाहीर झाला आहे. तर चित्रपट क्षेत्रासाठीचा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. कीर्तन-प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार संजयनाना धोंडगेंना जाहीर झाला आहे. वाद्यसंगीत क्षेत्रातील पुरस्कार पांडुरंग मुखडे यांना जाहीर झाला आहे.
जीवनगौरव पुरस्काराच्या रक्कमेत वाढ
जीवन गौरव पुरस्काराच्या रक्कमेत मागच्या वर्षीपासून वाढ झाली आहे. १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे. तीन लाख रुपये रोख, मानपत्र आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd