गरबा असो किंवा पॉप कल्चर ९० च्या काळात प्रत्येक तरुण तरुणीला आपल्या तालावर थीरकायला भाग पाडणारी गायिका फाल्गुनी पाठक सध्या पुन्हा चर्चेत आहे. नवरात्र तोंडावर जरी आलं असलं तरी यावेळी फाल्गुनी मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने फाल्गुनीच्या ९० च्या दशकातील सुपरहीट ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याला नवीन पद्धतीने सादर केल्याचं फाल्गुनीला खटकलं आहे. यावर नुकतंच फाल्गुनीने तिची बाजू स्पष्ट केली आहे.
नेहा कक्करच्या या नवीन गाण्यामुळे फाल्गुनी सध्या नाराज असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय कित्येक चाहत्यांनीही नेहाला सोशल मीडियावर याबद्दल ट्रोलही केलं आहे. “चांगल्या गाण्याला खराब कसं करायचं हे नेहाकडून शिकावं” असं म्हणत या गाण्यावर लोकांनीही चांगलीच टीका केली आहे.
आणखी वाचा : “सगळीच मुलं खूप…” अभिनेत्री जुही चावलाचं सुहाना खान आणि इतर स्टारकिड्सबद्दलचं वक्तव्य चर्चेत
खुद्द फाल्गुनी पाठकनेही याविषयी पिंकव्हिलाला दिलेल्यामुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणते “या गाण्याला आजही मिळणारी पसंती पाहून मला खरंच खूप आनंद झाला आहे.” नेहाने तिचं गाणं वापरल्यामुळे आता ती काही यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची विचारणा झाल्यावर फाल्गुनी म्हणाली, “मला खरंतर यावर कायदेशीर कारवाई करायची आहे, पण या गाण्याचे हक्क माझ्याकडे नाहीत.”
नेहाचं हे नवीन ‘ओ सजना’ हे गाणं १९ सप्टेंबर रोजी युट्यूबवर प्रदर्शित झालं. या गाण्याची धुन आणि काही शब्द तेच असून काही शब्द बदलले आहेत. या गाण्याला तनिष्क बागची याने संगीतबद्ध केलं असून तो अशाच जुन्या गाण्यांना नव्या पद्धतीने सादर करण्यासाठी ओळखला जातो. कित्येक संगीतप्रेमींनी नेहा आणि फाल्गुनीला सोशल मीडियावर टॅग करून या गाण्याची कठोर शब्दांत आलोचना केली आहे.