‘बेबी डॉल’, ‘चिट्टीया कलाइया’ या सारख्या गाण्यांमुळे तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिकाच्या चारही टेस्ट पॉझिटीव्ह आल्या. त्यामुळे सध्या तिच्यावर लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कनिकाला करोनाची लागण झाल्यापासून तिच्याविषयीच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहेत. यामध्येच काही अफवादेखील पसरल्या होत्या.मात्र या साऱ्यावर पीजीआय रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. के. धीमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पुणे मिरर’नुसार, कनिकाला करोनाची लागण झाल्यानंतर तिची प्रकृती खालावली आहे. तसंच तिला रुग्णालयात योग्य ते उपचार मिळत नसल्याच्या अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. मात्र हे सारं खोटं असल्याचं रुग्णालयाच्या संचालकांनी म्हटलं आहे. एएनआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Kanika Kapoor (in file pic) is asymptomatic(no symptoms), stable and doing well. She is taking food normally. Information circulated in the media that she is very sick is false: Dr RK Dhiman, Director, Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow pic.twitter.com/7gTb0GyKoH
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2020
‘कनिकाची नवीन टेस्ट केल्यानंतर तिच्यात करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीयेत. तिची प्रकृती सध्या स्थिर आणि उत्तम आहे. तसंच तिच्या आहारातही कोणताच बदल झालेला नाही. तिचं खाणंपिणं दैनंदिन सवयीप्रमाणेच सुरु आहे. इतकंच नाही तर तिची तब्येत बिघडल्याची माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र हे सारं खोटं आहे. तिची प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे’, असं रुग्णालयाचे संचालक डॉ. आर.के. धीमान यांनी सांगितलं.
कनिकाच्या तब्येतीत सुधारणा असून, येत्या काही दिवसामध्ये तिची पुढील चाचणी निगेटीव्ह येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला डिस्चार्जही दिला जाऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गायिका कनिका कपूरची तब्बल चार वेळा करोना विषाणूची चाचणी करण्यात आली. चौथ्यांदाही तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तिच्यावर लखनऊ येथील संजय गांधी पीजीआयएमएस या रुग्णालयात उपचार असून रुग्णालयात राहून घरातल्यांना मिस करत असल्याचं तिने सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटलं होतं.