प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरापूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वासच बसत नाही. तसेच संपूर्ण बॉलिवूडही केकेच्या निधनानं हादरलं आहे.
केकेने अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. संगीत क्षेत्रात त्याचं योगदान मोठं आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल केकेने कधीच गाण्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. सुरुवातीपासूनच तो गाणं शिकला नाही. कृष्णकुमार कुन्नथ हे त्याचं पूर्ण नाव. पण आजही त्याला केके या नावाने ओळखतात. दिल्ली येथेच राहणाऱ्या केकेने किरोडीमल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेत असतानाच त्याने स्टेजवर सहज एक गाणं गायलं होतं. त्यानंतरच केकेला गाण्याची आवड निर्माण झाली.
आणखी वाचा – Timepass 3 : “आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण मार्बल फोडेल”, ‘टाईमपास ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
पहिल्यांदाच स्टेजवर गाणं गायल्यानंतर त्याच्यामध्ये गाण्याची आवड निर्माण झाली. आणि त्याने त्याचा प्रवास सुरु ठेवला. एका मुलाखतीदरम्यान केकेने सांगितलं होतं की, “मी गाणं कधीच शिकलो नाही. गाणं शिकण्यासाठी मी म्युझिक स्कुलमध्ये गेलो होतो. पण काही कारणास्तव मला तिथे जाणं देखील थांबवावं लागलं.” लहानपणापासूनच केकेला संगीताची आवड होती. इतर गाणी ऐकत आणि त्यामधून शिकत त्याने आपलं करिअर घडवलं.
आणखी वाचा – VIDEO : ‘धर्मवीर’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये फक्त एकच माणूस, व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओक म्हणाला…
केकेने संगीत क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. त्याने आजवर ३ हजारपेक्षा अधिक जिंगल्ससाठी काम केलं आहे. १९९९मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटासाठी त्याने ‘तडप तडप’ हे गाणं गायलं. या गाण्यामुळेच केके नावारुपाला आला. त्याचं ‘याद आएंगे वो पल’ हे गाणं आजही प्रत्येक तरुणाच्या तोंडी ऐकायला मिळतं.