प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. केके यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कोलकातामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके यांची तब्येत बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार ५३ वर्षीय केके यांचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जातं.
केके उर्फ कृष्ण कुमार कन्नथ हे बॉलिवूड इंस्ट्रीत मोठं व्यक्तिमत्त्व मानले जात होते. संगीताचं शिक्षण घेतलेलं नसतानाही आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी बरीच हीट गाणी गायली आणि त्यातून प्रसिद्धी देखील मिळवली. पण केके यांनी त्यांचं खासगी आयुष्य मात्र या प्रसिद्धीपासून नेहमीच दूर ठेवलं. फार कमी लोकांना माहीत आहे की केके यांनी त्यांच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव ज्योती आहे. केके आणि ज्योती यांना दोन मुलं आहेत.
आणखी वाचा- कसं झालं गायक ‘केके’चं निधन? वाचा कोलकाता कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं
अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी
केके यांनी कपिल शर्मा शोमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. ज्योती यांच्याशी त्यांची ओळख शाळेत असताना झाली होती. त्यावेळी ते सहावीत होते आणि तेव्हापासून दोघंही एकमेकांसोबत होते. ते म्हणाले, “संपूर्ण आयुष्यात मी एकाच मुलीला डेट केलं आणि ती माझी पत्नी ज्योती आहे. त्यावेळी मी खूप लाजरा होतो त्यामुळे तिला व्यवस्थित डेटवरही नेऊ शकलो नाही. आता कधी कधी माझी मुलं देखील मला यावरून चिडवतात.”
आणखी वाचा- सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण: सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, नेमकं काय आहे कारण?
दरम्यान केके आणि ज्योती बालपणापासून एकमेकांसोबत होते. त्यांनी १९९१ साली लग्न केलं होतं. लग्नाआधी केके यांना नोकरी शोधावी लागली होती. त्यावेळी काहीच पर्याय नसल्यानं त्यांनी सेल्समन म्हणूनही काम केलं. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. पण ६ महिन्यांतच ते आपल्या नोकरीला कंटाळले आणि त्यांनी ही नोकरी सोडली. पण या काळात त्यांना त्यांचे वडील आणि पत्नी यांची खंबीर साथ मिळाली आणि त्यांनी संगीत क्षेत्रात आपलं करिअर सुरू केलं.