हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. या महान अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी चित्रपटसृष्टीतूनही प्रार्थना करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही ट्विटरद्वारे चिंता व्यक्त केली आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असं साकडं त्यांनी देवाकडं घातलं आहे.
‘दिलीप कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मला प्रसारमाध्यमांतून मिळाली. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Mujhe news dekhkar pata chala ki Dilip kumar ji ki tabiyat acchi nahi hai.Unki sehat mein jald sudhaar ho yehi meri Ishwar se prarthana.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 5, 2017
लिलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दिलीप कुमार यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करतेय. मूत्रपिंडासंबंधी समस्या असून, त्यासंबंधीचे उपचार त्यांच्यावर सुरु आहेत. दरम्यान, लिलावती रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीपकुमार यांची किडनी व्यवस्थित काम करत नसल्यामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. दिलीप कुमार यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी काही दिवसांपासूनच ताप होता अशीही माहिती मिळाली आहे. दिलीप कुमार यांची भाची आणि अभिनेत्री सायशाची आई शाहीनने ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. दरम्यान, दिलीप कुमार यांचे चाहतेही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.