कर्नाटकात काही दिवसांपूर्वीच हिजाबचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर आता ‘हलाल मीट’ मुद्द्यावरून नवा वाद सुरू झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी हलालची तुलना ‘आर्थिक जिहाद’शी केली होती. ज्यावर आता प्रसिद्ध गायक लकी अली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लकी अली यांनी हलाल या शब्दाचा अर्थ देखील समजावून सांगितला आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘हलाल मीट’ला ‘आर्थिक जिहाद’ म्हणत हिंदू लोकांनी हलाल मीट वापरू नये असं सांगितलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आणि कर्नाटकात यावरून गोंधळ सुरू झाला. यावर आता गायक लकी अली यांनी लांबलचक पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा- Video: करीना कपूरच्या कारखाली अडकला फोटोग्राफरचा पाय, अभिनेत्री चिडून म्हणाली…
लकी अली यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘प्रिय भारतीय बंधू आणि भगिनींनो, आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल. मी तुम्हाला काही समजावून सांगू इच्छितो… ‘हलाल’ हे नक्कीच इस्लाम बाहेरील कोणत्याही व्यक्तीसाठी नाही. म्हणजेच जे इस्लाम धर्म मानत नाहीत किंवा पाळत नाहीत, त्यांच्यासाठी ‘हलाल’ ही गोष्ट नाही. त्याचं असं आहे की एखाद्या पदार्थामध्ये कोणत्या वस्तू वापरल्या गेल्या आहेत हे कळत नाही तोपर्यंत कोणताही मुस्लीम व्यक्ती त्याच्या यहूदी नातेवाईकांकडून कोणतेच पदार्थ विकत घेत नाही किंवा त्यात त्याच गोष्टी वापरल्या गेल्या आहेत, ज्याचा ते उपभोग घेऊ शकतात असेच पदार्थ ते विकत घेतात.’
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लकी अली पुढे लिहितात, ‘मुस्लीम लोक ‘हलाल’ला कोशर प्रमाणे मानतात, जे यहूदी संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते. आता जर कंपन्यांना मुस्लिम आणि यहूदी लोकांना आपली उत्पादनं विकायची असतील तर त्यांना उत्पादनांवर हलाल प्रमाणित किंवा कोशर प्रमाणित असे लेबल लावावे लागेल. अन्यथा मुस्लिम आणि यहूदी त्यांच्याकडून कोणतेही खरेदी करू शकत नाहीत. पण ज्या लोकांना ‘हलाल’ या शब्दाशी समस्या असेल त्यांनी ते त्यांच्या काउंटरवरून हे शब्द काढून टाकावे पण यामुळे त्यांची विक्री पूर्वीसारखीच होईल याची शाश्वती नाही.’
आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं
लकी अली यांनी सांगितला ‘हलाल’चा अर्थ
लकी अली यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘हलाल’ शब्दाचा अर्थही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितलं, हलाल हा एक अरबी शब्द असून त्याचा इंग्रजी अर्थ ‘जस्टीफाइड’ म्हणजेय ‘न्याय्य’ असा होतो. तर ‘कोशर’ हा शब्द, यहूदी कायद्याच्या नियमानुसार तयार करण्यात आलेल्या खाण्याच्या पदार्थांसाठी वापरला जातो.
काय आहे नेमका वाद?
भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, ‘हलाल हा एक प्रकारचा आर्थिक जिहाद आहे. ज्याचा अर्थ असा आहे की मुस्लीमांनी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसोबत बिझनेस करू नये.’ दरम्यान सीटी रवी यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकात ‘उगाडी’ उत्सवानंतर हिंदू लोकांनी हलाल मीटचा वापर आपल्या जेवणात करू नये असं आवाहन केलं जात आहे. तसेच हलाल ऐवजी लोकांनी ‘झटका मीट’ वापरावं असा सल्ला दिला जात आहे.