प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीशी ब्रेकअप झालं आणि त्यानंतर या ब्रेकअपची सर्वत्र चर्चा सुरू झाली. वैयक्तिक आयुष्यातील या अनपेक्षित घडामोडींमुळे आपण नैराश्यात असल्याचं नेहाने सोशल मीडियावर सांगितलं. काही गोष्टी न जाणून घेता माझ्याविषयी मत बनवू नका, मला जगू द्या अशी विनंती तिने या पोस्टमध्ये केली आहे.
‘हो मी नैराश्यावस्थेत आहे. जगातील नकारात्मक लोकांचे मी आभार मानते. मला आयुष्यातील सर्वांत वाईट अनुभव देण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन!. केवळ ठराविक एक-दोन व्यक्तींमुळे आज माझी ही अवस्था नाही हे मी स्पष्ट करू इच्छिते. तर माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वाटेल ते चर्चा करणाऱ्या लोकांमुळे मी त्रस्त आहे. मला न ओळखता, माझ्याबाबत काय घडलं याची कल्पना नसताना लोकांनी माझ्याबद्दल मतं बनवायला सुरुवात केली. मी तुम्हाला विनंती करते, कृपया मला जगू द्या,’ अशा शब्दांत नेहाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर पडणं किती वेदनादायी असतं, हे तिने याआधीही एका पोस्टमधून सांगितलं होतं. ‘या जगात इतके वाईट लोकही आहेत हे मला माहीत नव्हतं. एका सेलिब्रिटीला पर्सनल आणि प्रोफेशनल असे दोन चेहरे असतात. वैयक्तिक आयुष्यात तुम्ही कोणत्याही समस्यांना तोंड देत असलात तरी प्रोफेशनल लाइफमध्ये आम्हाला नेहमीच हसतमुख राहावं लागतं,’ अशा शब्दांत तिने आपलं दु:ख व्यक्त केलं होतं.
नेहा ‘इंडियन आयडॉल १०’ या रिअॅलिटी शोची परीक्षक असताना हिमांशने सेटवर हजेरी लावत तिला सरप्राइज दिलं होतं. त्यावेळी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र ब्रेकअपनंतर नेहाला शूटिंग करणंदेखील कठीण झालं होतं. बऱ्याचदा तिला सेटवरही रडू कोसळलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप हिमांशने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.