प्रसिद्ध गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी पती निखील भाटियासोबत नोएडाहून आग्र्याला जात होती. यावेळी यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात निखील भाटिया गंभीर जखमी आहे. निखील भाटिया रुग्णालयात दाखल असून प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
अपघातानंतर शिवानीला रुग्णालयात आणण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या वाहनासोबत धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात कारचा अक्षरक्ष: चुराडा झाला.
शिवानी भाटिया बिहारच्या सीतामढी जिल्ह्याची रहिवासी होती. महुआ टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सुरो का संग्राम’ कार्यक्रमात ती उपविजेता राहिली होती. आपल्या आवाजाच्या जोरावर तिने नाव कमावलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी आपल्या पतीसोबत पाम ओलम्पिया गॉ़ड चौक ग्रेटर नोएडाहून कारने आग्र्याला निघाली होती. पण रात्रीच त्यांच्या कारचा अपघात झाला.
शिवानी आग्र्याला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. यावेळी तिचा पती निखील कार चालवत होता. अपघातानंतर दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान शिवानीचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.