गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनेकदा अनुभवली आहे. त्याची काही गाणी तर इतकी लोकप्रिय आहेत की, ती चाहत्यांच्या अगदी तोंडपाठ आहेत. ‘कल हो ना हो’, ‘अभी मुझ में कही’ या आणि अशा अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. बॉलीवूडमध्ये त्याने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सोनू निगम हा केवळ गायकच नाही तर तो उत्तम माणूस असल्याचेही अनेकदा पाहायला मिळालं आहे. त्याच्या गाण्याचे अनेक लाईव्ह शोज होत असतात आणि या लाईव्ह शोजमधून सोनू निगम रसिकांना मंत्रमुग्ध करतो.

सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्येही लोक गर्दी करतात. त्याचे असंख्य चाहते त्याला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असतात, तर सोनू निगमही शक्य तितक्या चाहत्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गाण्याने चर्चेत राहणारा सोनू निगम सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच त्याच्या लाईव्ह शोमधील गायनाचेही अनेक व्हिडीओ तो शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

सोनू निगमने त्याच्या सोशल मीडियावर एका महिला चाहतीचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि ही महिला चाहती पोलिस आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलिस सोनू निगमसमोर गाणं सादर करत आहे, तर सोनू निगमही तिला गाणं गाण्यात साथ देत आहे. सोनू निगमसमोर गाणं गातानाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. त्याचवेळी ती महिला पोलिस सोनू निगमसमोर काहीशी भावूक झाल्याचेही पहायला मिळत आहे.

गाणं सादर केल्यानंतर महिला चाहती सोनू निगमबरोबर फोटोही काढते. तसंच गायकदेखील तिच्या गाण्याचं कौतुक करतो आणि “देव तुम्हाला आशीर्वाद देवो” अशा शुभेच्छाही देतो. सोनू निगमने हा व्हिडीओ स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “कधीकधी व्हिडीओमधील पवित्रता आणि शुद्धता इतकी भारी असते की, व्हिडीओ पोस्ट करताना तुम्हाला आणखी काय लिहावे हे कळत नाही.”

सोनू निगमने शेअर केलेला हा व्हिडीओ ८ मार्च रोजी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतरचा असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सोनू निगमच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याशिवाय अनेक गायक मंडळींनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “किती हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे”, “किती छान”, “खूपच भारी” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.