प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अनेक गाणी अजरामर केली आहेत. शुक्रवारी (२८ जून) दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आशा भोसले यांच्या जीवनावरील ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या सोहळ्याला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, सरसंघचालक मोहन भागवत, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र, या सगळ्यात लोकप्रिय गायक सोनू निगमच्या एका कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये लोकप्रिय गायक सोनू निगम हा आशा भोसले यांचे पाय धुताना दिसत आहे. ज्या प्रकारे तो खाली बसतो, आशाताईंचे पाय स्वच्छ कपड्यावर ठेवतो आणि त्यांचे पाय धुण्याआधी कपाळाला हात लावतो, त्याच्या या कृतीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गुलाबाच्या पाकळ्या असलेल्या पाण्याने आशाताईंचे पाय धुतल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यानंतर आशाताई सोनू निगमला आशीर्वाद देत असल्याचेदेखील पाहायला मिळाले.

‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तक प्रकाशनावेळी सोनू निगमने आशा भोसले यांच्याविषयी बोलताना म्हटले आहे की, ‘देवी मातेला अभिवादन, मला अजिबात काही बोलायचे नव्हते; पण मला बोलण्यासाठी सांगण्यात आले आहे. मी एवढेच म्हणू इच्छितो की, आज शिकण्याची अनेक माध्यमे आहेत, पण ज्याकाळी शिकण्यासाठी कोणतीच साधने उपलब्ध नव्हती, तेव्हा लताजी आणि आशाजी तिथे होत्या. त्यांनी संपूर्ण जगाला गाणं शिकवलं आहे”, असे म्हणत सोनू निगमने आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या व्हिडीओवर अनेक जण गायकाची स्तुती करत आहेत, तर काहींनी टीकादेखील केली आहे. नेटकऱ्यांनी सगळीकडे दिखाऊपणा करण्याची गरज नसते असे म्हटले आहे, तर काहींनी म्हटले आहे, मोहन भागवतही बसले आहेत, त्यांचेही पाय धुवा. काहींनी सोनू निगमच्या कृतीला मूर्खपणा म्हटले आहे.

हेही वाचा : विकी कौशलने कतरिना कैफच्या प्रेग्नेन्सीच्या अफवांवर सोडलं मौन; म्हणाला, “जेव्हा वेळ येईल…”

दरम्यान, पुस्तक प्रकाशनावेळी आशा भोसले भावूक झालेल्या दिसून आल्या. “माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल याची कल्पना नव्हती. माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत राहा. दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम संपता कामा नये. मी घरातली तिसरी बहीण. आमचा एक पांडव गेला तरीही मी अजून आहे”, असं म्हणताना त्या भावूक झाल्या होत्या. आशा भोसले यांच्यावर ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचं आणि दुर्मीळ छायाचित्रांचं ‘स्वरस्वामिनी आशा ‘ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer sonu nigam washed asha bhosale feet as an expression of his gratitude towards her netizens said all for camera nsp