मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांची नावं सारखी सारखी असतात. मराठी सिनेविश्वात अनेक समान आडनावं असलेले कलाकारही आहेत. या कलाकारांचं एकमेकांशी कोणतंही रक्ताचं नातं नाही. मात्र, तरीही ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, असा चाहत्यांचा समज होत असतो. असंच काहीसं संगीत विश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि सुदेश भोसले यांच्याबरोबरही घडतं.
चाहते या दोघांना नेहमी ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, असं समजतात. आशा भोसले यांचे सुदेश भोसले हे पुत्र आहेत, असं अनेक चाहत्यांना वाटतं. अशात आता सुदेश भोसले यांनी आशा भोसले यांच्यासोबतच्या नात्याबाबत वक्तव्य केलं आहे. या दोघांचं नातं नेमकं कसं आहे, तसेच सुदेश भोसले आशा यांना आई म्हणून केव्हापासून हाक मारतात, याचा एक सुंदर किस्सा सांगितला आहे.
सुदेश भोसले यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. आशा भोसले यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकलेले अनेक गायक असूनही त्या अनेक कार्यक्रमांत सुदेश यांनाच बरोबर घेऊन जात होत्या. त्याचं कारण सुदेश भोसले यांनी त्यांना एकदा विचारलं होतं. “अनेकदा मी त्यांना विचारायचो की, शास्त्रीय संगीत शिकलेले तुमच्याकडे अनेक गायक आहेत. मग तरी तुम्ही नेहमी मलाच का बरोबर घेऊन जाता. त्यावर त्यांनी म्हटलं होतं, अरे तू चांगला गातोस आणि तू एक चांगला माणूस आहेत”, असं सुदेश भोसलेंनी सांगितलं.
“एका शोमध्ये आम्ही एकत्र गेलो होतो. त्यावेळी तेथील एक जण मला पाहून आशाजींना म्हणाला की, हा कोण मुलगा आहे? तुमचा मुलगा आहे तर इतके दिवस त्याला लपवून का ठेवलं. त्यावर त्या म्हणाल्या होत्या की, नाही हा माझा मुलगा नाही. त्यानंतर पुढे एका कार्यक्रमात त्यांनी थेट माझी ओळख मी त्यांचा मुलगा आहे, अशीच करून दिली होती”, असं सुदेश भोसले यांनी सांगितलं.
तेव्हापासून आई म्हणायला लागलो…
“माझी ओळख सांगताना त्या म्हणाल्या की, एक मुलगा येत आहे. लहानपणापासून त्यानं याची-त्याची नक्कल केली. मी त्याला सांगितलं की, शास्त्रीय संगीत शिक. मात्र, त्यानं कधी ऐकलं नाही. आता तो मोठा झाला आणि अमिताभ बच्चनसाठी गाणी गात आहे. येतोय माझा मुलगा सुदेश. अशा पद्धतीनं मग पुढे मी त्यांना आशाजी म्हटलंच नाही. मी त्यांना आई म्हणूनच हाक मारतो”, असं सुदेश भोसले यांनी सांगितलं आहे.
मागच्या जन्माचं नातं…
मुलाखतीत पुढे सुदेश भोसले म्हणाले, “आजही महिन्यातून दोनदा-तीनदा त्या मला फोन करतात आणि म्हणतात, सुदेश काय करतोयस? तुझी बायको हेमाला सांग की, आज मी घरी येत आहे. त्या येतात आणि तीन ते चार तास आम्ही गप्पा मारत असतो. त्यामुळे आशाजी माझ्याकडे असं का येतात, तर काहीतरी एक मागच्या जन्माचं नातं आहे. त्यामुळे त्या मला इतकं प्रेम आणि आशीर्वाद देतात.”