ठसकेबाज गायनाने ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गिरगाव फणसवाडी येथील निवासस्थानी शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहेत.
सुलोचना चव्हाण यांना माई या नावाने ओळखले जाते. सुलोचना यांच्या गायनाने महाराष्ट्राच्या लावणीला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. सुलोचना चव्हाण यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी एक खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्कारावरुन सरकारवर टीका केली आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन
सुलोचना चव्हाण यांनी नुकतंच प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते आईविषयी बोलताना म्हणाले, “माझी आई ही माझी गुरू होती. आज ती मला सोडून गेली. ज्यावेळी लावणीला काहीही प्रतिष्ठा नव्हती, तेव्हा अत्यंत सन्मानाने त्या लावणी गात होत्या. त्याकाळी लावणीकडे ज्या वक्रदृष्टीने पाहिलं जायचं, तो दृष्टीकोन आईमुळे बदलला. तिने फडावरची लावणी घराघरात पोहोचवून लावणीला एक वेगळा मान मिळवून दिला.”
“काही वर्षांपूर्वी सरकारने आईला पद्मश्री दिला. वयाच्या नव्वदीत असताना तिला हा पुरस्कार मिळाला पण एकाच गोष्टीची खंत वाटते की असे पुरस्कार कलाकाराला योग्य वयात मिळायला हवेत. जेव्हा आईला हा पुरस्कार मिळाला त्यावेळी आईची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. हा पुरस्कार कशासाठी आणि कोणाकडून मिळतोय हे देखील आठवत नव्हतं. आयुष्याच्या शेवटी हे असे पुरस्कार दिल्याने त्याचे काहीच मूल्य राहत नाही, ही मोठी खंत आहे. त्यामुळे येत्या काळात कलाकारांचा योग्य सन्मान होईल एवढीच भावना व्यक्त करतो.” असे ते यावेळी म्हणाले.
आणखी वाचा : “मला १ रुपया…” विजय पाटकरांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण
दरम्यान वृद्धापकाळानुसार सुलोचना यांची स्मृती कमी झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला होता. यंदाच्या २०२२ च्या पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन पोहोचल्या होत्या.