सिंहासन या सिनेमाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रालयात शुटिंगची संमती कशी मिळवून दिली? तसंच सिंहासन सिनेमा करताना यशवंतराव चव्हाण यांना कसं सांगितलं? यशवंत राव चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली हे भन्नाट किस्से जब्बार पटेल यांनी सांगितले आहेत. यशवंतराव चव्हाण हे तेव्हा भारताचे उपपंतप्रधान होते त्यांना जेव्हा कळलं की मी सिंहासन सिनेमा करतोय तेव्हा ते काय म्हणाले हेदेखील जब्बार पटेल यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले जब्बार पटेल?

शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. मी त्यांना भेटलो होतो त्यावेळी मला शरद पवार म्हणाले की चला माझ्यासोबत तुम्हाला कुठे जायचं आहे मी सोडतो. त्यानंतर मी त्यांच्यासोबत गेलो. मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांची कार थेट सांताक्रुझ विमानतळावर गेली. तिथे एअर इंडियाचं मोठ्ठं विमान आलेलं होतं. त्यात उप पंतप्रधान यशवंतराव चव्हाण उतरले. मला शरद पवारांनी दिलेलं हे सरप्राईजच होतं. मला ज्या दिवशी मंत्रालयात शुटिंगची संमती दिली त्याच दिवशी आम्ही तेव्हा उपपंतप्रधान असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची भेट घडवली. मला कळेना हे नेमकं काय आहे ते पुढच्या पंधरा मिनिटात समजलं.

यशवंतराव चव्हाण नेमकं काय म्हणाले?

मी आणि शरद पवार यशवंतरावांना भेटलो, ते मला म्हणाले “अरे जब्बार कसे आहात तुम्ही बरे आहात का?” मी म्हटलं ‘हो’. त्यावर शरद पवार मला म्हणाले बसा पुढे बसा. मी त्यांच्यासोबत कारमध्ये पुढे बसलो. मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार आणि उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण. त्यांना शरद पवारांनी सांगितलं. “साहेब जब्बार सिंहासन कादंबरीवर सिनेमा करतोय”. कल्पना करा काय असेल तो माहोल. मला यशवंतराव लगेच म्हणाले, “जब्बार काय हो काय झालंय तुम्हाला? सिंहासन ही फार शुष्क कादंबरी आहे. ड्राय कादंबरी आहे अत्यंत. माझ्या मते अरूण साधूचं सगळ्यात वाईट काम आहे ते. तुम्ही त्यावर सिनेमा का करताय? राजकारणी लोकांच्या गोष्टी इकडे तिकडे होतात. त्यावर तुम्ही सिनेमा करताय? बँकेचं कर्ज काढून? काय झालंय तुम्हाला?” मग मी त्यांना सांगितलं की मुंबई दिनांक ही कादंबरीही जोडतोय सिनेमाला. त्यावर यशवंतराव लगेच म्हणाले, “काय सांगताय? अहो It’s a Classic Work Of Arun Sadhu. वा! क्या बात है गो अहेड. मला तेव्हा शरद पवारांचा दृष्टीकोन कळला. मी मंत्रालयात शुटिंगची संमती तर दिली. पण त्यांना ते व्हेरिफाय करायचं असावं” यापुढे घडलं ते अजून भन्नाट आहे.

सभागृहाची डिग्निटी घालवू नका असं मला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं

आम्ही माहिमच्या जवळ आलो आणि यशवंतराव साहेब म्हणाले, जब्बार तुम्ही विधानसभेतही शुटिंग करणार असाल. मी म्हटलं होय. त्यावर यशवंतराव म्हणाले एक गोष्ट वडिलकीच्या नात्याने सांगतो. “जब्बार फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. फार मुश्किलीने, तुम्हाला माहित आहे. इतक्या लोकांचे बळी गेले आहेत. किती कुणाचं योगदान आहे मी काय सांगू. विधानसभेत जे काम चालतं ते बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतं. त्या सभागृहाला एक डिग्निटी असते. जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका” असं मला यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं. त्यानंतर काही महिन्यांनी मला दिल्लीत यशवंतराव भेटले त्यांनी मला सांगितलं मी सिनेमा पाहिला आणि तुम्ही सभागृहाची डिग्निटी ठेवलीत सिनेमात हे त्यांनी मला आवर्जून सांगितलं. कसा हातभार या सिनेमाला लागला ते मला आजही व्यवस्थित आठवतं आहे. असं जब्बार पटेल यांनी सांगितलं.

Story img Loader