अभिनेता दुलकर सलमानच्या ‘सिता रामम्’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा चित्रपट तेलुगूमध्ये तयार करुन नंतर इतर भाषांमध्ये डब करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दुलकर सलमान मल्याळम सिनेसृष्टीतला सुपरस्टार आहे. मल्याळम चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्याने तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटदेखील केले आहेत.
दुलकर सलमानने मुंबईच्या बॅरी जॉन अॅक्टिंग स्टुडिओ येथून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. त्याने २०१२ मध्ये ‘सेकंड शो’ या मल्याळम चित्रपटापासून या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. तो सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेते मामूट्टी यांचा मुलगा आहे. कर्ली टेल्स यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने त्याच्या आयुष्यातला एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी सिनेसृष्टीशी जोडलेल्या कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे अगदी लहान असतानाच मला सिनेमाची आवड होती. पण मला सुरुवातीला खूप भीती वाटायची. प्रेक्षकांना माझा अभिनय आवडेल की नाही हा विचार सतत मनात यायचा. लोक माझी आणि माझ्या वडिलांची तुलना करतील हेही मला ठाऊक होते. त्यावेळी मी कॅमेरासमोर उभा राहायला घाबरायचो.”
आणखी वाचा – ऐश्वर्या राय, ए आर रहमान, शोभिता धूलिपाला यांचा इकॉनॉमी क्लासने प्रवास, फोटो व्हायरल
सतत वाटणाऱ्या भीतीमुळे त्याने अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने दुबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. दोन-अडीच वर्ष सलमान त्या कंपनीमध्ये काम करत होता. याबद्दलची आठवण सांगत तो म्हणाला, “काम करुनही मला समाधान मिळत नव्हतं. मला ९ ते ५ काम करायचा कंटाळा आला होता. तेव्हा मी काही मित्रांसह शॉर्टफिल्म्स बनवायला लागलो. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही ते सिनेक्षेत्रात काम करण्यासाठी मेहनत घेत होते. त्यांना पाहून मी प्रेरीत झालो आणि नोकरी सोडून अभिनय करण्याचा निर्णय घेतला.”
आणखी वाचा – “ज्या चित्रपटात मी धावतो तो…” अभिनेता शाहरुख खानने दिली होती कबुली
त्याने २०१८ मध्ये इरफान खानसह ‘कारवां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘चुप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या ‘गन्स अॅन्ड गुलाब्स’ या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.