यंदाचा बारावा ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सव ३ ते ९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार असून मराठी चित्रपटांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त अद्याप प्रदर्शित न झालेले नवीन सहा मराठी चित्रपट हे यंदाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर वात्रटिकाकार आणि दिग्दर्शक रामदास फुटाणे यांचा ‘सरपंच भगीरथ’, सुप्रसिद्ध छायालेखक लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शनातील पदार्पण असलेला व मंगेश हाडवळे निर्मित ‘टपाल’, धनंजय कुलकर्णी दिग्दर्शित ‘सांजपर्व’, शंतनू रोडे दिग्दर्शित ‘जयजयकार’, पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित ‘दफ्तर’ आणि उमेश नामजोशी दिग्दर्शित ‘भाकरवाडी सात किलोमीटर’ असे सहा मराठी चित्रपट हे यंदाच्या ‘थर्ड आय’ महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना ‘एक्सलन्स इन स्क्रीन अॅक्टिंग’ हा पुरस्कार ‘थर्ड आय’तर्फे जाहीर करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे शतकमहोत्सवी वर्ष असल्याने चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांचे स्मरण, मराठी चित्रपटांसाठीचा विशेष विभाग अशा अनेकविध गोष्टी यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार असून ९ जानेवारीपर्यंत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन ‘कोएन ऑफ स्प्रिंग’ या व्हिएतनामी चित्रपटाने, तर समारोप ‘आफ्टर शॉक’ या चिनी चित्रपटाने करण्यात येणार आहे. या वेळी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जागवणारा कमल स्वरूप दिग्दर्शित ‘रंगभूमी’ हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. १९२० साली हिंदुस्तान फिल्म कंपनीतून बाहेर पडल्यानंतर दादासाहेब फाळके यांनी वाराणसीत वास्तव्य केले होते. त्या दरम्यान त्यांनी ‘रंगभूमी’ नावाचे नाटक लिहिले, त्यावर हा माहितीपट बेतला असल्याची माहिती एशियन फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी दिली.
याशिवाय, लघुपट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शकाला ५० हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. रवींद्र नाटय़ मंदिर येथे २५ डिसेंबरपासून महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी करण्यात येणार आहे.
आशियाई चित्रपट महोत्सवात सहा मराठी चित्रपट
यंदाचा बारावा ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सव ३ ते ९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार असून मराठी चित्रपटांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त
आणखी वाचा
First published on: 22-12-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six marathi films in third eye asian film festival