मराठीत एकाच वेळी चित्रपट, मालिका, सोहळे, नाटक व सुपारी अशी पंचरंगी घोडदौड सुरू असताना हिंदी चित्रपटसृष्टीत कशाला जायचे असा अनेक मराठी कलाकार विचार करीत असले तरी त्यात एखादा अपवाद ठरतोच. सिया पाटीलच्या बाबतीत तसे झाले आहे. तिने मकरानी दिग्दर्शित ‘फिल्मी अंदाज’ या मनोरंजक मसालेदार चित्रपटातील भूमिका स्वीकारली व सिंगापूर-मलेशिया येथे जाऊन चित्रीकरण करून ती परत आली.
याबाबत सिया पाटील सांगत होती, मराठीत आपले व्यवस्थित सुरू असताना हिंदी चित्रपटांतूनही भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे हिंदूीतील माझ्या या पहिल्या चित्रपटात माझी दुहेरी भूमिका आहे. त्या भूमिकांचे स्वरूप आताच सांगून मला चित्रपट रसिकांची उत्सुकता कमी करायची नाही. पण हिंदी चित्रपटाचे विश्वच वेगळे. व्यावसायिक व कमालीचा सकारात्मक विचार करणारे असे आहे.
माझे हिंदीवर प्रभुत्व निर्माण व्हावे, मी नेहमीपेक्षा अधिक सुंदर दिसावे व हिंदीतील वातावरणाचा माझ्यावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी केवळ माझ्यापुरता तब्बल एक महिन्याचा अभ्यासक्रम होता. अशा महिनाभराच्या तयारीनंतर प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाल्याचा मला फायदा झाला. हिंदी चित्रपटातून भूमिका साकारल्याने या माध्यम व व्यवसायाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलला जातो, असे माझ्या लक्षात आले.
या हिंदी चित्रपटात सिया पाटीलसोबत मन्सूर खान हा नवा नायक आहे. त्याशिवाय राजू खेर, शरद सक्सेना इत्यादींच्याही भूमिका आहेत. सिया पाटीलची भूमिका असलेले जागरण व बोल बेबी बोल हे मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. तर मस्त कलंदर, अण्णासाहेब साठे व माझे नाव मकरंद अशा तीन मराठी चित्रपटांतही ती काम करीत आहे. हिंदीत गेले तरी मराठीला विसरणार नाही, असेही सिया म्हणाली.  

Story img Loader