त्यामुळे ज्या अपेक्षेच्या मनोरंजनाने प्रेक्षक चित्रपटगृहात जातो ती अपेक्षा चित्रपट पूर्ण करू शकला तर ठीक. ‘आत्मा’ हा चित्रपटही ती अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होतो खरा पण पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षकाला येत असल्यामुळे प्रेक्षकाला औत्सुक्य मात्र वाटत नाही. त्यामुळे भीती वाटण्याऐवजी, धक्के बसण्याऐवजी अनेकदा हसूच येईल. ‘आत्मा’ हा खरेतर तथाकथित भयपट म्हणावा लागेल.
माया वर्मा (बिपाशा बासू), अभय वर्मा (नवाझुद्दिन सिद्दीकी) हे जोडपं आणि निया (डोयल धवन) ही त्यांची छोटुकली असा संसार आहे. परंतु, अभयचे आपल्या पत्नीवर प्रेम नाही फक्त मुलीवर त्याचे भारीच प्रेम आहे. अनेकदा संशय घेऊन अभय मायाला मारहाणही करतो. सात वर्षांच्या संसारानंतर दोघे काडीमोड घेतात. नियाला फक्त आठवडय़ातून एक तास भेटण्याचा निर्णय न्यायालय देते त्यामुळे निराश झालेला अभय त्या दु:खात कोर्टातून निघतो आणि त्याचे अपघाती निधन होते. मुलीबद्दल खूप प्रेम असलेला हा बाप मृत्यूनंतर तिला भेटायला येतो. परंतु, आपला लाडका बाबा आता या जगात नाही हे नियाचे लहान वय लक्षात घेऊन माया तिला सांगत नाही. त्यामुळे बाबा मला भेटला, बोलतो रोज हे निया सांगते तेव्हा मायाच्या पायाखालची जमीन सरकते. नंतर अभयचा आत्मा मायालाही दिसतो, तिचा पाठलाग करतो, तिला छळतो. नियाला त्याच्यापासून वाचविण्यासाठी माया खूप प्रयत्न करते. या एकाच गोष्टीभोवती सिनेमा फिरतो.
उत्तम छायालेखन, भयपटासाठी आवश्यक असलेले ध्वनिसंयोजन या दोनच गोष्टी जमेच्या आहेत. त्यामुळे त्या जोरावर दिग्दर्शक रहस्यमय भयपट साकारण्यात यशस्वी झालाय असे मर्यादित अर्थाने म्हणता येईल. पण आत्मा या शीर्षकानुरूप प्रेक्षकाला भय, थराराचा अनुभव हवा होता तो सिनेमा देत नाही. पुढे काय होणार याचा अंदाज प्रेक्षक सहज बांधू शकतो म्हणून औत्सुक्य राहत नाही. बिपाशाने यापूर्वीही भयपटात काम केले असला तरी तिचा अभिनय बेतास बात म्हणावा लागेल. नवाझुद्दिन सिद्दीकी प्रथमच भयपटात काम करीत असला तरी त्याच्या भूमिकेला लांबी नाही. त्यामुळे त्याला अभिनयाची झलक दाखवायची फारसी संधी नाही. छोटय़ा डोयल धवनने चांगला अभिनय केला आहे.
भूतप्रेत, जादूटोणा, भगत, पंडित, पुजारी हा सगळा ठरीव फॉम्र्युला भयपटाला आवश्यक असतोच म्हणून या चित्रपटात आला आहे असे जाणवते. अभय वर्माचे भूत, त्याचा आत्मा अपुरी इच्छा राहिल्यामुळे येतो हे सयुक्तिक वाटत असले तरी संवाद, पटकथा यात ढिलेपणा असल्यामुळे प्रेक्षक फारसा गुंतून राहात नाही. आणखी एक भयपट पाहिला असे त्याला वाटते. आरशाचा दिग्दर्शकाने ठिकठिकाणी आत्मा किंवा भूत दाखविण्यासाठी केलेला वापर चांगला आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फूटेजचा वापरही चांगला केला आहे. परंतु, नावीन्यपूर्ण असे काहीच नसल्यामुळे आणखी एक भयपट एवढेच याचे वर्णन करता येईल.
आत्मा
निर्माता – कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक
लेखक-दिग्दर्शक – सुपर्ण वर्मा
छायालेखक – सोफी विन्क्वीझीट
संकलक – हेमल कोठारी
संगीत – संगीत व सिद्धार्थ हल्दीपूर
कलावंत – बिपाशा बासू, नवाझुद्दिन सिद्दिकी, डॉयेल धवन, शेरनाझ पटेल व अन्य. 

Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल