दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य सध्या त्याच्या ‘थंडेल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागा चैतन्यने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच घटस्फोटाबद्दल व्यक्त झाला आहे. नागा चैतन्यने दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिच्याशी झालं होतं, पण त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने आता घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
दोघेही आता आयुष्यात पुढे गेलो आहोत आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आहे, असं नागा चैतन्यने म्हटलं आहे. नागा चैतन्य रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्टमध्ये म्हणाला, “आम्हाला आपापल्या मार्गाने जायचं होतं. आमची काही कारणं होती, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्ही आपापल्या पद्धतीने आयुष्यात पुढे जात आहोत. यापेक्षा जास्त स्पष्टीकरणाची गरज का आहे? मला खरंच कळत नाही. मला आशा आहे की प्रेक्षक आणि माध्यमे या गोष्टीचा आदर करतील. कृपया आमचा आदर करा आणि आम्हाला या बाबतीत प्रायव्हसी द्या.”
नागा चैतन्य पुढे म्हणाला, “मी खूप चांगल्या पद्धतीने आयुष्यात पुढे गेलो आहे आणि तीही आयुष्यात पुढे गेली आहे. आम्ही दोघेही आपापली आयुष्ये जगत आहोत. मला पुन्हा प्रेम मिळालंय, मी खूप आनंदी आहे आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आहे.”
समांथाबद्दल मनात खूप आदर आहे, त्यामुळे लोकांनी माझ्याबद्दल सकारात्मक राहावं, असं नागा चैतन्यने म्हटलं. “हे फक्त माझ्या आयुष्यात घडलंय असं नाहीये, मग मला गुन्हेगारासारखं का वागवलं जातंय?” असा सवाल नागा चैतन्यने उपस्थित केला.
लग्न संपवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना नागा चैतन्य म्हणाला, “हा निर्णय समोरच्या व्यक्तीच्या भल्यासाठीच होता. निर्णय काहीही असला तरी तो खूप विचार करून आणि समोरच्या व्यक्तीचा खूप आदर करून घेतला गेला होता. हा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. मी हे बोलतोय कारण हा माझ्यासाठी अतिशय संवेदनशील विषय आहे. मी एका विखुरलेल्या कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे तो अनुभव कसा असतो हे मला माहीत आहे. नातं तोडण्यापूर्वी मी हजार वेळा विचार करेन कारण मला त्याचे परिणाम माहीत आहेत. हा परस्पर सहमतीने घेतलेला निर्णय होता.”
नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. मात्र, २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने डिसेंबर २०२४ मध्ये सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं.