दहा ते बारा वर्षांची गायत्री सुट्टी संपवून वसतिगृहात परत निघाली आहे. या वेळी लहानपणापासून पाठीवर मायेचा हात ठेवणाऱ्या आईसोबतचे प्रसंग ती सांगतेय. हे वर्णन करत असताना आईचा चेहरा मात्र दाखविला जात नाही. जाहिरातीच्या शेवटच्या प्रसंगात आईवर कॅमेरा जातो आणि प्रेक्षक अवाक् होऊन पाहत राहतात. ही आई एक तृतीयपंथी असते. तिचे नाव गौरी सावंत. जाहिरातीच्या शेवटी गौरीच्या अश्रूंची सुरुवात होते. ‘विक्स’ या कंपनीची जाहिरात गेल्या अनेक दिवसांपासून समाजमाध्यमांवर गाजत आहे. आई ही व्यक्ती नसून ती एक भावना आहे, यात लिंगभेद नसतो. हा समाजातील महत्त्वाचा संदेश देणारी जाहिरात तृतीयपंथी समाजातील वास्तवाचे दर्शन घडवत आहे. ही कथा गौरी सावंत यांच्या जीवनातील सत्य घटना आहे. यानिमित्ताने अशाच हटके पण समाजभान जपणाऱ्या जाहिरातींचा ऊहापोह..
जाहिरातीतून समाज प्रबोधन हा विषय आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही अनेक जाहिरात संस्थेने समाजातील महत्त्वाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. मुळात जाहिरातीमध्ये केवळ अर्थार्जन असते असा आपला समज आहे. तो काही प्रमाणात खरा असला तरी जाहिरात ही कला आहे हेही तितकेच खरे. प्रेक्षकांचा ठाव घेणारे, त्यांच्यावर प्रभाव टाकणारे विषय काही सेकंदात तयार करणे ही जिकिरीचे असते. त्यासाठी लागणारी सर्जनशीलताही लाखमोलाची असावी लागते. समाजातील खदखदते विषय जाहिरात मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणल्यामुळे प्रेक्षक त्या कंपनीशी जोडला जातो. त्यामुळे एकीकडे व्यवसाय सांभाळतानाही सामाजिक बांधिलकीचे भान जपत केलेल्या या जाहिराती प्रबोधनाच्या पलीकडे पोहोचतात. स्वत:ची एक वेगळी जागा पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण करतात. या जाहिरातींमधला भावनिकतेचा धागा हल्ली त्यातल्या उत्पादनापेक्षाही वरचढ ठरू पाहतो आहे. किंबहुना, जााहिरातींचे अर्थशास्त्र या मानवी भावभावनांमध्ये गुंतलेले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा कित्येक जाहिराती सध्या टेलिव्हिजन, समाजमाध्यमांवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कर्करोगाशी दोन हात करणाऱ्या महिलांविषयीची ‘डाबर वाटिका’ या कंपनीची जाहिरातही बरीच प्रसिद्ध झाली होती. कर्करोगाशी झगडणाऱ्या महिलेवरील ही जाहिरात समाजातल्या निषिद्धपणावर बोट ठेवणारी आहे. स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व फुलवणारे जाडजूड काळेभोर केस हे स्त्रियांच्या सौंदर्यातील जमेची आणि महत्त्वाची बाजू मानतात. केसांशिवाय असलेली स्त्री आपल्या डोळ्यासमोरही येणे अशक्य. कर्करोगातून ही स्त्री बचावते मात्र तिला आपले केस गमवावे लागतात. अशा परिस्थितीत नवऱ्याला कसे सामोरे जायचे किंवा नोकरीच्या ठिकाणी कसे जावे या विवंचनेत असतानाही सत्य परिस्थितीला सामोरे जाण्याची तिची धडपड असते. आपण सुंदर दिसत नाही ही भावना तिला अस्वस्थ करत राहते. केस नसल्यामुळे म्हटली जाणारी कुरूपता झाकण्याचा ती प्रयत्नही करते. मात्र तिला वास्तवाचे भानही आहे. या जाहिरातीतील एक प्रसंग मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. नोकरीवर जाण्यासाठी तयारी करीत असताना साडी नेसून ही स्त्री आरशात स्वत:ला न्याहाळत असते. त्याच वेळी तिचा नवरा तेथे येतो आणि..
नवऱ्याबरोबर कार्यालयातील सहकारीही तिला साथ देतात. ‘डाबर वाटिका’ या केशतेलाच्या कंपनीने सौंदर्य हे केसांवर अवलंबून नसते हे सांगणारी जाहिरात करणे ही बाब पहिल्यांदा जाहिरात पाहताना आश्चर्यकारक वाटत असली. तरी इथेच भावनिकतेचा योग्य पद्धतीने वापर करून आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला जाहिरात कंपन्यांनी साधली आहे, हे यामागचे खरे गुपित आहे. ‘तू फौलाद है तू है फूल’ हे गाणं जाहिराती दरम्यान सुरू असते. त्यामुळे दृक्श्राव्य माध्यमातून ही जाहिरात प्रेक्षकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरते. अशाच प्रकारे परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या ऑटिझम या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाच्या पित्यावर आधारित ‘बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स’ची तीन मिनिटांची जाहिरात तुम्हाला भावनिक करते. पत्नीच्या मृत्यूनंतर ऑटिस्टिक मुलाला सांभाळण्याची जबाबदारी एकटय़ा पुरुषावर पडते. नोकरीतून मिळणारे उत्पन्न बेताचे असते. त्यातून अधिक तर पसे मुलाच्या शिक्षणावर व आजारपणावर खर्च करावे लागतात. त्यातच नोकरी जाते. अशा वेळी कोणाचीही मदत न घेता विमा काढून तो मुलाच्या शिक्षणाचा आणि नव्या व्यवसायाचा खर्च उचलतो. काळाला तुम्ही थांबवू शकत नाही, मात्र काळ तरी तुम्हाला कुठे थांबवू शकतो. या वाक्याने जाहिरातीचा शेवट होतो. अशाच प्रकारची ‘एचडीएफसी लाइफ’ची जाहिरात तयार करण्यात आली आहे. यातही अपंगत्व आलेल्या मुलीच्या स्वावलंबनासाठी प्रयत्न करणारा पिता दाखवण्यात आला आहे. कृत्रिम पायाच्या साहाय्याने मुलीची नृत्याची इच्छा पूर्ण करत असताना तिला परावलंबी होऊ न देणे यासाठी प्रयत्नशील असणारा पिता या जाहिरातीत दाखविण्यात आला आहे. ‘तू उडजा पर फैलाये, है आसमा तेरा रे..’ असं आपल्या मुलीला सांगणारा पिता ज्याप्रमाणे मुलीच्या भवितव्यासाठी तरतूद करून ठेवतो त्याप्रमाणे इतरांनीही करावी असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे. या जाहिरातीतील समाजाचा नेमका धागा पकडून त्यात विषय गुंफण्याचे काम करतात. यातून आपल्या कंपनीच्या प्रसिद्धीबरोबरच समाज प्रबोधनही होत असते. अशा बऱ्याच जाहिराती चांगल्या विषयांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. बऱ्याचदा दुर्लक्षित विषय वेगळ्या धाटणीतून मांडण्याचा प्रयत्न या निर्मिती संस्थांकडून केला जातो. २०१४ मध्ये ‘नेसकॅफे’ या कंपनीने तोतरेपणा या व्यंगाची जाणीव करून देणारी आणि याच व्यंगातून आलेल्या न्यूनगंडावर मात करण्याची प्रेरणा देणारी जाहिरातीची निर्मिती केली आहे. एका पार्टीमध्ये एक तोतरा विनोदवीर तरुणानं तिथल्या गर्दीशी साधलेला हा संवाद आहे. अगदी साधा.. त्यात त्याच्या आयुष्यात आलेल्या नराश्यावर, होणाऱ्या टीकेवर मात कशी केली ते तो सांगतो. स्पष्ट बोलता येत नसल्याने आलेल्या नराश्यावर संगणकावरील चित्रफीत पाहताना वेगळा दृष्टिकोन देऊन जाते. हा तोतरेपणा ‘बफिरग’सारखा असल्याचे त्याच्या लक्षात येते. आणि हाच या जाहिरातीचा वळणाचा मुद्दा ठरतो. आणि एरवी घाबरणारा विनोदवीर वेगळ्या शैलीत मित्रांना हे सगळे विनोदाने सांगतो. हसण्यातूनच सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात, हे त्याच्या लक्षात येत जाते. आणि या विनोदवीराचा आत्मविश्वास त्याच्या बोलण्यातून जाणवत राहतो. ही जाहिरात तुम्हाला केवळ हसवतेच असे नाही, तर समाजात आपण अशा तोतऱ्या व्यक्तींना कशा प्रकारची वागणूक देतो, या मुद्दय़ावर अंतर्मुखही करतो.
दूरचित्रवाणीवरील जाहिराती म्हणजे मालिका आणि चित्रपटांतील ब्रेकचा, बिनकामाचा, आशयविहीन भाग अशी आपल्याकडची समजूत, त्यातही अनेकदा निर्बुद्ध जाहिरातींचा होणारा मारा, यामुळे काही सेकंदाचं हे माध्यम केवळ मार्केटिंग तंत्रासाठीच प्रसिद्ध. पण अशा काही सेकंदातून तुमची एखाद्या घटनेकडे, माणसांकडे, समूहाकडे पाहण्याची प्रेक्षकांची जीवनदृष्टीच बदलण्याचं काम अशा काही मोजक्या जाहिराती करतात. या जाहिरातीसारख्या माध्यमाची ताकद आणि परिणामकारकता अशा चांगल्या कामासाठी वापरली गेल्यास ती पाहणाऱ्या समाजमनात निश्चित चांगला बदल घडवेल हे नक्की.
गायत्रीला भविष्यासाठी तिला वसतिगृहात ठेवले आहे. गेली अनेक वष्रे मी तिचा सांभाळ करते. मात्र तृतीयपंथीयांना कायद्यानुसार मूल दत्तक घेता येत नाही. याची खंत आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील एक सल समाजासमोर आली आहे.
गौरी सावंत, सखी चारचौघी संस्था