‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता कार्तिक आर्यन आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ या सुपरहिट चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांचा आकडा आणखीनच वाढला आहे. पण कार्तिक आर्यनसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये कार्तिकने इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला किती स्ट्रगल करावं लागलं आणि या काळात सर्वाधिक मदत कोणाची झाली हे त्याने सांगितले.
‘अभिनयाची आवड लहानपणापासूनच असल्याने मी अभ्यासात कधीच लक्ष केंद्रीत करू शकलो नव्हतो. बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळावा म्हणून ऑडीशन्स देण्यासाठी मी भटकत होतो. यामुळे कॉलेजमधली हजेरी कमी झाल्याने मला शिक्षण मध्येच सोडावं लागलं,’ असं तो म्हणाला.

स्ट्रगलिंगच्या काळात कार्तिकला सोशल मीडियाची फार मदत झाल्याचंही तो सांगतो. तो पुढे म्हणाला, ‘अभिनेता, स्टार होण्यासाठी मला सोशल मीडियाने फार मदत केली. ऑडिशन्सबद्दल सर्च करण्यासाठी मी सतत फेसबुक आणि गुगलची मदत घ्यायचो. इंडस्ट्रीत मला कोणाबद्दलच फारशी माहिती नसल्याने सोशल मीडिया हा एकच पर्याय माझ्यासमोर होता. अॅक्टर्स हवे आहेत किंवा कास्टिंग कॉल्स असे की-वर्ड टाकून मी सर्च करत होतो.’ या काळात २ BHK फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत असल्याचंही कार्तिकने सांगितलं.

वाचा : लग्नाबाबत गुप्तता राखण्यासाठी विराट अनुष्कानं दिली खोटी नावं 

‘प्यार का पंचनामा’ आणि त्याचा सिक्वल बॉक्स ऑफीसवर चांगला गाजला. सिक्वलनंतर कार्तिकने इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. आपला मुलगा शिकलेला अभिनेता असावा अशी आई-वडिलांची इच्छा होती म्हणून इंजीनिअरिंगची डिग्री मिळवली, असं त्याने सांगितलं.

‘लुका छुपी’नंतर कार्तिक सध्या त्याच्या आगामी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर भूमिका साकारणार आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या ‘पती पत्नी और वो’चा हा रिमेक आहे.

Story img Loader