सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे. छत्तीसगड जिल्हातील विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या लीनाने घरातच गळफास घेत जीवन संपवले. ती २३ वर्षांची होती. बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात लीना शिकत होती.
लीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. रील्स व व्हिडीओमधून तिला लोकप्रियता मिळाली होती. तिचे इन्स्टाग्राम १० हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. लीना तिचे आई-वडील व भावांबरोबर छत्तीसगडमधील विहार कॉलनीत राहत होती.
२६ डिसेंबरला लीना दुपारी बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतल्यावर लीना रुममध्ये नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. लीनाला पाहण्यासाठी तिची आई घराच्या गच्चीवर गेली असता दरवाजा बाहेरुन बंद दिसला. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी गच्चीचा दरवाजा तोडला. तेव्हा गच्चीवरील एका पाईपाला गळफास घेत लीनाने आत्महत्या केल्याचं आढळलं.
लीनाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. लीनाचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी लीनाने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्यामुळे लीनाच्या आत्महत्येचा अधिक तपास पोलीस करत आहेत.