Misha Agrawal passed away : एका लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं निधन झालं आहे. ही दुःखद बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर आणि सोशल मीडिया स्टार मिशा अग्रवाल हिचे २५ व्या वर्षी निधन झाले आहे.
मिशाचा आज (२६ एप्रिल रोजी) वाढदिवस होता. पण वाढदिवसाच्या दोन दिवस आधी तिने या जगाचा निरोप घेतला. मीशाच्या निधनाच्या वृत्ताला तिच्या कुटुंबियांनी अधिकृत पोस्ट शेअर करून दुजोरा दिला आहे. मिशाचे इन्स्टाग्रामवर साडेतीन लाख फॉलोअर्स आहेत.
मिशा अग्रवालच्या निधनाची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली आहे. मिशाच्या कुटुंबियांनी तिच्या अकाउंटवर एक भावनिक पोस्ट केली आहे. “आम्ही जड अंतःकरणाने तुम्हाला कळवत आहोत की आमची लाडकी मिशा आता आमच्यात नाही. तुम्ही तिला दिलेल्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. आम्ही अजूनही यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया तिला तुमच्या आठवणींमध्ये जिवंत ठेवा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा,” असं मिशाच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पाहा पोस्ट-
मिशाच्या मृत्यूची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. सुरुवातीला अनेकांचा यावर विश्वास बसला नाही आणि काहींना वाटलं की ही पोस्ट फेक आहे. मात्र तिच्या कुटुंबियांनी तिच्या निधनाची पुष्टी केल्यानंतर सोशल मीडियावर शोककळा पसरली. फॅन्स आणि फॉलोअर्स मिशाला श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, “मला आशा आहे की ही बातमी खोटी आहे, ती खूप सुंदर आणि प्रतिभावान होती. तिच्या कुटुंबासाठी प्रार्थना.” तर दुसऱ्याने लिहिले, “अजूनही विश्वास बसत नाही… ती खूप चांगली होती.”
मिशा अग्रवालच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे तिच्या निधनाची बातमी खरी नसल्याचं चाहत्यांना वाटत होतं. पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली.