जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२२ रोजी देशात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली महिला आयोगाच्या वतीनेही काल एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या पुरस्कार सोहळ्यात महिलांच्या कार्यात योगदान देणाऱ्या ६४ यशवंत व्यक्तिमत्वांचा सन्मान केला. महिला सक्षमीकरण आणि संरक्षणासाठी दिल्ली महिला आयोगाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “हे आयोग मजबूत आणि सक्रीय असल्यामुळे महिलांना या शहरात अधिक सुरक्षित वाटते.”
या पुरस्कार विजेत्यांमध्ये भारतीय लष्कर, वायुसेवा, नौदल, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, इस्रो, दिल्ली पोलीस अधिकारी आणि इतर विविध क्षेत्रातील विविध वयाच्या, असामान्य कामगिरी केलेल्या व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे मराठमोळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळी हिचा देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली.
“ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके, डीजी बीआरओ लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी, एअर मार्शल के अनंतरामन, डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल आणि दिल्ली सरकारचे मंत्री यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळवणाऱ्या या ६४ व्यक्तींमध्ये भारतीय हॉकी संघाचे सदस्य नमित तपो आणि रजनी एथिमारपू, ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व करणारे नौदल कमांडर आंचल शर्मा, ८१ वर्षीय राम बेटी, ८९ वर्षीय शांताबाई राम बेटी, आणि भारताच्या पहिल्या मिसेस इंडिया अभिनेत्री अदिती गोवित्रीकर यांचा देखील समावेश होता.
‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं!
कोण आहे प्राजक्ता कोळी?
प्राजक्ता कोळी हिने मुलुंडमधील वझे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स या महाविद्यालयात मास मीडियामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. प्राजक्ताने मुंबईतल्या १०४ रेडिओ एफएममध्ये एक वर्ष इंटर्न म्हणून काम केलंय. याच दरम्यान तिची ओळख सुपरस्टार अभिनेता ह्रतिक रोशनसोबत झाली आणि त्यावेळी त्याच्यासोबत एक व्हिडीओ तयार केला.
त्यानंतर तिने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी तिनं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. लोकांच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या विषयावर ती वेगवेगळे व्हिडीओ तयार करू लागली. तिने सैफ अली खान, आयुष्यमान खुराना, काजोल, जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, आणि विक्की कौशल यांसारख्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत तिने व्हिडीओ तयार केले. २०१७ रोजी आयडब्ल्यूएस डिजीटल अवॉर्डसाठी ‘व्हायरल क्वीन’ म्हणून तिला सन्मानित करण्यात आलं होतं.